'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला'; परळीत रस्त्याच्या प्रश्नावरून झळकले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:39 PM2022-07-27T20:39:10+5:302022-07-27T20:39:32+5:30
रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत बॅनर लावले आहे.
परळी ( बीड): 'कोणी रस्ता देता का रस्ता', 'मासा लागला गळाला, नगरसेवक कुठे पळाला', 'फक्त मत मागायला येता ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट'; असा मजकूर लिहलेले बॅनर परळीत झळकले आहे. रस्त्याची अवस्था अंत्यंत खराब झाल्याने त्रस्त नागरिकांनी व्यथेची याद्वारे वाचा फोडली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील सिद्धेश्वर नगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाल्याने या भागातील नागरिकांनी गांधीगिरी करत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात मंगळवारी रात्री बॅनर लावले. हे बॅनर कोणीतरी फाडल्या मुळे बुधवारी पुन्हा दुसरे बॅनर त्याच ठिकाणी लावले. बुधवारी अनधिकृत बॅनरच्या नावाखाली नप कर्मचाऱ्यांनी हे बॅनर खाली उतरविले, त्याच्या निषेधार्थ बॅनरची वाजत गाजत व घोषणाबाजी करीत टॉवरपासून प्रभाग 5 मध्ये नागरिक व कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत पुन्हा गांधीगिरी केली. बॅनर लावून रस्त्याचा प्रश्न लावल्याने प्रशासनाला याची दखल घेईल आणि लवकर दुरुस्ती होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
परळी शहरातील प्रभाग क्रमांक 5 मधील सिद्धेश्वर नगरचे नागरिक रस्त्याच्या दुरावस्थे मुळे हैराण झाले आहेत.नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी गांधीगिरी करीत बॅनर लावले. बॅनर लावण्याच्या संदर्भात नागरिकांनी परळी नगरपालिकेला एक निवेदनही दिले होते
- श्रीनिवास राऊत, सामाजिक कार्यकर्ता, प्रभाग क्रमांक5 परळी