जेथे आईने शिकवले, ती शाळा बांधली स्वखर्चाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:11 AM2019-06-23T00:11:21+5:302019-06-23T00:11:45+5:30
शाळेत आईने १२ वर्षे ज्ञानदानाचे काम केले, त्या शाळेची इमारत मोडकळीस आली. त्यानंतर सुकळी येथील गायकवाड बंधूनी ५० लाख रुपयांचा स्वखर्च करीत शाळा बांधून दिली.
दीपक नाईकवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : ज्या शाळेत आईने १२ वर्षे ज्ञानदानाचे काम केले, त्या शाळेची इमारत मोडकळीस आली. त्यानंतर सुकळी येथील गायकवाड बंधूनी ५० लाख रुपयांचा स्वखर्च करीत शाळा बांधून दिली. या ज्ञानमंदिरात येणाऱ्या पिढींचे भविष्य घडणार आहे.
तालुक्यातील सुकळी येथील सुमनबाई गायकवाड या १९९० ते २००२ या कालावधीत सुकळी येथे अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांची अंगणवाडीची शाळा जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत भरत असे. या काळात त्यांनी गावातील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. दरम्यानच्या काळात त्यांचा मुलगा बिभीषण गायकवाड यांचे शिक्षण मामाचे गाव बाभळगाव येथे झाल्यानंतर त्यांनी उद्योगव्यवसायासाठी पुणे गाठले. तेथे ते उद्योग व्यवसायात यशस्वी झाले.
दरम्यान, ज्या शाळेत आई सुमनबाई गायकवाड यांनी विद्यार्थी घडवत त्यांना ज्ञानदान केले त्याच शाळेची इमारत जीर्ण झाली होती. त्या शाळेची भव्य इमारत बांधून देण्याचा निश्चय बिभीषण व बाळासाहेब गायकवाड या बंधुनी केला.
गतवर्षी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांची परवानगी मिळवून शाळा इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली. त्यासाठी सर्वोत्तम साहित्याचा वापर गायकवाड बंधुनी केला. २० एमएमच्या लोखंडी सळईचा वापर करून शाळेचे बांधकाम एक वर्षात पूर्ण केले. शाळेच्या पाच वर्गखोल्यासह संरक्षण भिंतीच्या बांधकामास ५० लक्ष रुपयांचा खर्च आला.
या शाळेच्या खोल्यांचे लोकार्पण १८ जून रोजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, उपशिक्षणाधिकारी कराड, गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांच्यासह पत्रकार व सुकळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले. सुकळी येथील गायकवाड बंधुचा आदर्श समाजाने घेत मंदिर उभे करण्याऐवजी ज्ञानमंदिराची उभारणी केली तर येणा-या पिढीचे भवितव्य घडेल व उघड्यावर ज्ञानार्जन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नाही.
विचार बोलून दाखविला, कृती केली
आईने ज्या शाळेत विद्यार्थी घडवले त्या शाळेची इमारत जीर्ण झाल्याने त्या शाळेची नवीन इमारत बांधून देण्याचा विचार आईला सांगितल्यानंतर आईनेही यास होकार दिल्याने जीर्ण झालेल्या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम केले असल्याचे बिभीषण गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.