शेतकरी मित्र असो की पुत्र; नेत्यांनो चारा, पाण्यासाठी कधी बोलणार?
By सोमनाथ खताळ | Published: April 9, 2024 07:06 PM2024-04-09T19:06:43+5:302024-04-09T19:07:33+5:30
पीपल्स मॅनिफेस्टो: शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संताप : उमेदवारांसह राजकीय नेते केवळ प्रचारातच व्यस्त
बीड : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एप्रिल महिन्यातच १२२ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार आणि नेतेमंडळी व्यस्त आहे. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार, असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.
जिल्ह्यात गावे, वाड्यावस्त्यांची संख्या ही दीड हजारांच्या घरात आहे. लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील छोटे-मोठे प्रकल्प कोरडेठाक पडत आहेत. सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ १६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १२२ गावांत एप्रिलमध्येच टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार? याची चिंता सर्वांनाच आहे. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमाेल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त आहे.
प्रशासन म्हणतेय १९२ दिवस पुरेल चारा
जिल्ह्यात लहान, मोठे, शेळी, मेंढ्या असे १३ लाखांच्या घरात पशुधन आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन ३ किलो, तर मोठ्यांसाठी ६ किलो चारा लागतो. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही १९२ दिवस चारा पुरेल असा दावा प्रशासनाने केला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागात चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे.
जिल्ह्यात १४४ टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात एप्रिलच्या सुरुवातीलाच १२२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. सध्या १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. आतापर्यंत १४३ जलस्त्रोत अधिगृहीत केले आहेत.
हा पाण्याचा अपव्यय कधी थांबवणार?
जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असतानाही आजही काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर आदी ठिकाणी पाण्याची नासाडी होत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही जागोजागी लिकेज झाल्या आहेत. यामुळेही लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
आवश्यक उपाययोजना तातडीने करा
दुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याचे पाणी, चारा, ऊसतोड मजुरांना रेशन यांसह आवश्यक उपाययोजना तातडीने कार्यान्वित करा, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्याचे सांगण्यात आले.
अशी आहे आकडेवारी
जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठा शिल्लक- १६ टक्के
बोअर व विहिरी अधिग्रहित - १४३
कोणत्या तालुक्यात किती टँकर सुरू
बीड ६०
गेवराई ५९
शिरूर ६
पाटोदा ४
आष्टी ९
परळी ५
धारूर १
एकूण १४४
बोअर, विहीर अधिग्रहण
बीड २४
गेवराई १०
वडवणी ५
शिरूरकासार ८
पाटोदा २
अंबाजोगाई ३८
केज २२
परळी २
धारूर २०
माजलगाव ८
एकूण १४३