कोण्या विषाणूने मारले हे पाखरू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:21+5:302021-01-18T04:30:21+5:30
कडा : पाटोदा तालुक्यातील मूगगांव येथे बर्ड फ्ल्यूने कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर याचे लोण आष्टी तालुक्यात पसरले आणि शिरापूर, धानोरा, ...
कडा : पाटोदा तालुक्यातील मूगगांव येथे बर्ड फ्ल्यूने कावळ्यांचा मृत्यू झाल्यानंतर याचे लोण आष्टी तालुक्यात पसरले आणि शिरापूर, धानोरा, पिंपरखेड येथेदेखील पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला. मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने त्या तीन गावातील मृत पक्ष्यांचा अहवाल काय येणार याकडे पशुसंर्वधन विभागाचे लक्ष लागले आहे. तर कोण्या विषाणूने हे पक्षी मृत झाले असावेत या शंकेने तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढली आहे.
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्या होत्या. त्याचबरोबर धानोरा, पिंपरखेड येथे दोन पक्षी मृतावस्थेत आढळून आले. या तीनही गावातील पंचनामा करून पक्ष्यांचे नुमने पशुसंवर्धन विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. नमुने पाठवून चार दिवसांचा कालावधी उलटला आहे. अद्याप या मृत पक्ष्यांचा अहवाल पशुसंर्वधन विभागाकडे प्राप्त झाला नसल्याने अहवाल नेमका काय येतो, यामुळे तूर्तास तरी पशुसंवर्धन विभागासह तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील नियोजन केले जाईल.
नमुने पुण्याहून भोपाळला
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील मृत कोंबड्याचे व धानोरा, पिंपरखेड येथील पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. पण ते नमुने पुणे येथील प्रयोगशाळेतून भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. तालुक्यातील कोणत्याही गावात पक्षी किंवा कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. त्यांना कोणीही हात लावू नये, असे आवाहन केल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी लोकमतला सांगितले.