बीडमध्ये दीड हजार रूपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक चतुर्भूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 03:08 PM2019-04-30T15:08:26+5:302019-04-30T15:09:06+5:30
सातव्या आयोगाप्रमाणे वेतन निश्चितीसाठी मागितली लाच
बीड : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथील मोहिमाता विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला दीड हजार रूपयांची लाच स्विकारताना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.
तक्रारदाराचे वेतन सातव्या आयोगाप्रमाणे निश्चितीची सेवा पुस्तकेत लेखाधिकारी कार्यालयाकडून नोंद करून आणण्यासाठी मुख्याध्यापक महादेव वामन शिंदे (५८ रा.मादळमोही) यांनी दीड हजार रूपयांची लाच मागितली होती. लाच मागताच संबंधिताने २७ एप्रिल रोजी बीडच्या एसीबीकडे रितसर तक्रार केली. खात्री करून मंगळवारी सकाळीच शाळेतच सापळा लावला. लाच स्विकारताच दबा धरून बसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झडप घालत शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.एस.जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, दादासाहेब केदार, विकास मुंडे, सखाराम घोलप, सय्यद नदीम आदींनी केली.