...तर रोजगार हमीवरील निम्म्याच मजुरांना मिळेल मजुरी; एबीपीएस प्रणाली झाली लागू
By शिरीष शिंदे | Published: January 8, 2024 07:29 PM2024-01-08T19:29:40+5:302024-01-08T19:36:36+5:30
आधार-आधारित पेमेंट सिस्टमला झाली सुरुवात
बीड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना आधार क्रमांक आधारित पेमेंट सिस्टिमद्वारे (एबीपीएस) मजुरी दिली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील एबीपीएससाठी एक लाख ९१ हजार मजूर पात्र आहेत तर एक लाख १६ हजार मजूर अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे एकूण नोंदणीकृत मजुरांपैकी एबीपीएस पात्र मजुरांनाच मजुरी मिळेल, प्रलंबित असणाऱ्या मजुरांना काम करूनही त्यांना मजुरी मिळणार नाही. एकूण मजुरांपैकी निम्म्या मजुरांनाच मजुरी मिळणार आहे.
आधार क्रमांक आधारित पेमेंट सिस्टमद्वारे मजुरांचा आधार क्रमांकाचा वापर केला जाईल. हा मजुराचा आर्थिक पत्ता असणार आहे. ज्या मजुरांचे जॉब कार्ड हे आधार कार्डशी लिंक आहे व आधार कार्ड बॅंक खात्यासोबत लिंक त्यांनाच एबीपीएसद्वारे मजुरी मिळणार आहे. मग्रारोहयोअंतर्गत बीड जिल्ह्यातील एकूण ५५ टक्के मजूर एबीपीएससाठी पात्र आहेत.
दरम्यान, जॉब कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे. ही मुदत सध्या संपली असून त्यास पुन्हा मुदतवाढ मिळेल की नाही हे पुढील काळात समोर येईल. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात एबीपीएस प्रणाली सक्तीची करण्यात आली होती. जॉब कार्डसोबत आधार लिंकसाठी १ फेब्रवारी, ३१ मार्च, ३० जून, ३१ ऑगस्ट व त्यानंतर ३१ डिसेंबर अशी पाच मुदतवाढ देण्यात आल्या होत्या; परंतु, आता नव्याने जॉब कार्ड सोबत आधार लिंकसाठी नवी तारीख दिली गेली नाही. त्यामुळे ज्यांचे जॉब व आधार कार्ड लिंक झाले आहे, त्यांनाच मजुरी दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जॉब कार्ड डिलिट होतील
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एबीपीएससाठी अधिकारी व मजूरसुद्धा तयार नाहीत. मजुरांचे जॉब व आधार लिंकसाठी यंत्रणा आवश्यक आहे. एखाद्या मजुराचे आधार प्रमाणीकरण झाले नाही तर त्याचे जॉब कार्ड डिलिट होऊ शकते. तसेच जॉबसोबत आधार लिंक नसल्यास मजूर कामावर येणार नाहीत. त्याचा थेट परिणाम मजुरांच्या कामावर होईल. कामाची मागणी नियमित असेल तर जॉब कार्ड डिलिट होणार नाही हे जरी सत्य असले तरी काम केल्यास मजुरीच मिळणार नसेल तर मजूर कामावर कसे येतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१ जानेवारी रोजीचा एबीपीएस अहवाल
तालुका-मजूर संख्या-एबीपीएससाठी पात्र मजूर
अंबाजोगाई-२२,५४४-१०,७२१
आष्टी-५५,११०-३४,८९०
बीड-४२,५६३-२२,२२९
धारूर-१४,९४८-८,४१०
गेवराई-८२,३०६-३८,३१५
केज-२७,४५२-१७,८९८
माजलगाव-११,८८३-८,४६६
परळी-३०,३४२-१३,६१८
पाटोदा-१६,७९४-१०,६६७
शिरूर-३१,१३४-२०,२४९
वडवणी-१०,८५८-५,८९२
एकूण-३,४५,९३४-१,९१,३५५.