तलावात आंघोळ करताना उसतोड मजुराचा पाय घसरला, पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 03:27 PM2023-12-23T15:27:43+5:302023-12-23T15:29:12+5:30
कड्याच्या ऊसतोड मजूराचा सिध्दटेकच्या तलावात बुडून मृत्यू!
- नितीन कांबळे
कडा (बीड): अंघोळीसाठी गेलेल्या ऊसतोड मजूराचा पाय घसरून तलावात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.मनोज विलास कवडे ( २६ रा.कडा) असे मृत मजूराचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील मनोज कवडे हा अविवाहित तरूण अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीचे काम करतो. सध्या सिध्दटेक येथे मजूरांचा फड ऊसतोडणीसाठी आलेला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मनोज जवळच असलेल्या तलावावर एकटा अंघोळीसाठी गेला होता.अंघोळ करत असताना अचानक पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मनोज उशिरापर्यंत परत न आल्याने इतर मजूरांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा तलावाच्या कडेला त्याचे कपडे आढळून आले. पाण्यात बूडाल्याचा संशय येताच शुक्रवारी सकाळपासून ग्रामस्थांसह इतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तलावात शोध सुरू केला. शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. रात्री उशिरा कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे. अचानक मृत्यूची वार्ता आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.