बीडला १० हजारांची लाच घेताना वन परिक्षेत्र अधिकारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:34 AM2018-01-06T00:34:02+5:302018-01-06T00:34:05+5:30
गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बीडमधील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत याला शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बीडमधील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत याला शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.
गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे तक्रारदाराची सॉ मिल आहे. गतवर्षी या सॉ मिलवर गुन्हा दाखल झाला होता. यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व यावर्षी सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी राजपूतने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. पैकी ५ हजार रुपये यापूर्वी त्याने स्वीकारले आहेत. त्यानंतर तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा लावून त्याला शुक्रवारी सकाळी पकडले. राजपूत विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरक्षित जागेसाठी पळवापळवी
सकाळी राजपूत याने तक्रारदाराला पैशाची मागणी करीत कार्यालयात बोलावले. त्याप्रमाणे एसीबीने सापळा लावला; परंतु त्याने तेथे लाच स्वीकारली नाही. त्यानंतर राजपूतने त्याला बसस्थानकात बोलावले. तेथून जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये नेले. नंतर वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीसमोरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथून बाहेर येत त्याने पैशाची मागणी केली. तक्रारदाराने राजपूतच्या हातात पैसे ठेवताच एसीबीच्या अधिकाºयांनी झडप घातली.