मंडळ अधिकाऱ्याकडून लाच घेताना नायब तहसीलदार आणि शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 03:09 PM2021-12-31T15:09:57+5:302021-12-31T19:40:55+5:30
तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार होती.
माजलगाव (जि. बीड) : चौकशी अहवाल सकारात्मक देण्यासाठी मंडळाधिकाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना येथील नायब तहसीलदार (पुरवठा) सैदुराम तुकाराम कुंभार (५७) व शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशोक नामदेव नरवडे (५५, रा.पाटील गल्ली, माजलगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी एक वाजता नायब तहसीलदाराच्या शाहू सोसायटीतील निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली.
येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध रस्त्याच्या प्रकरणात शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने एक अर्ज दिला होता. शिवाय उपोषणदेखील केले होते. त्यावरून तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश नायब तहसीलदार (पुरवठा) सैदुराम कुंभार यांना दिले होते. दरम्यान, या प्रकरणात नायब तहसीलदार सैदुराम कुंभारने तक्रारदार अशोक नरवडेला तक्रार मागे घ्यायला लावतो व कारवाई होऊ नये यासाठी सकारात्मक अहवाल देतो, असे सांगून मध्यस्थी केली. त्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली.
मंडळाधिकाऱ्याने याबाबत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपअधीक्षक भारत राऊत यांनी तक्रारीची पडताळणी करून ३१ डिसेंबर रोजी दुपारी सापळा रचला. मंडळाधिकाऱ्याकडून एक लाखाची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार सैदुराम कुंभारला पकडले. त्यानंतर अशोक नरवडेलाही ताब्यात घेण्यात आले. पो.नि. रवींद्र परदेशी, अंमलदार सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, हनुमंत गोरे, सुदर्शन निकाळजे, अमोल खरसाडे, गणेश म्हेत्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.