वाळू चोरी प्रकरणास अभय कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:46 PM2019-06-24T23:46:16+5:302019-06-24T23:47:16+5:30
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
बीड : वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची तयारी केली आहे. मात्र या प्रकरणात सखोल चौकशी होत नाही. या वाळू चोरी प्रकरणाला अभय कोणाचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी वाळू चोरीसंदर्भात बैठक घेऊन अवैध वाळू चोरी थांवण्यासंदर्भात सूचना केल्या केल्या होत्या, यावेळी बैठकीमध्ये एक पोलीस अधिकारी व वाळू ठेकेदार व वाहतूकदार यांच्यात बाचाबाची झाली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.
त्यानंतर वाळू वाहतूकदार व ठेकेदारांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात हप्त्याच्या रेटकार्डसह निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतर बदनामी प्रकरणी नोटीस देण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली होती. त्यानंतर वाहतूकदार व ठेकेदार यांच्याकडून हप्ता कोणत्या अधिकाऱ्यांना दिला जायचा याचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, त्यानंतर देखील निवेदनाची दखल घ्यायची तरी अडचण आणि नाही घेतली तरी अडचण अशी अवस्था प्रशासनाची झाली आहे. निवेदनानुसार कारवाई करायची तर कारवाईची सुरुवात कोणापासून करायची आणि कोणाकोणावर कारवाई करावी हा प्रश्न देखील कायम आहे.
निवेदनात ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे, ते कधीपासून एकाच भागात कार्यरत आहेत? या भागातून अवैध वाळू वाहतूक होत असताना हे लोक काय करत होते? याची तरी चौकशी प्रशासन करणार आहे का? किंवा वाळू वाहतूकदारांना पुरावे मागणार आहे का? वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजीची जबाबदारी तलाठ्यापासून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, खनिकर्म अधिकारी या सर्वांची असते, मग यात कोणी कर्तव्यातकसूर केली आहे हे तरी तपासले जाणार आहे का ? हे सारे प्रश्न अनुत्तरीत आहेत. प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचा तपास धिम्यागतीने का ?
वाळू वाहतूकदारांच्या निवेदनानंतर पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घेतला आहे. पोलीस अधीक्षकांनी एका ठाणेप्रमुखासह काही कर्मचाºयांना नियंत्रण कक्षाशी जोडले आहे, मात्र या सर्व प्रकरणात वाळूशी संबंधित गुन्ह्याच्या तपासातील पोलिसांची दिरंगाई देखील दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मागील एक दीड वर्षात वाळूच्या अवैध वाहतूक, साठेबाजी , कर्मचाºयांवर हल्ले अशा स्वरुपाचे गेवराई, माजलगाव, आष्टी , शिरूर , बीड आदी पोलीस ठाण्यांमध्ये १०-१२ गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या नगण्य आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर एक ते दीड वर्ष उलटूनही अनेक गुन्ह्यात कुठलीही कारवाई झालेली नाही, तसे तपासात दिरंगाई का असा प्रश्न उपस्थित होत आहे.