‘त्या‘ शंभर एकर जमीन विक्रीतील मास्टर माईड कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:49+5:302021-09-08T04:39:49+5:30
दर्गा जमीन प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता रसद कोणी पुरविली? : बडे मासे गळाला लागण्याची शक्यता लोकमत ...
दर्गा जमीन प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
रसद कोणी पुरविली? : बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमीन बनावट समंतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समोर येताच सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असले तरी ‘त्या’ शंभर एकर जमीन विक्री प्रकरणातील मास्टर माईंड कोण? ती नावावर करण्यासाठी कोणी रसद पुरवली. महसूल वारीची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर होती. याचा तपास खोलात जाऊन केल्यास अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.
तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाची जमीन दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबुलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जमिनीची देखभाल करीत होते. पण २०२०मध्ये या जमिनीची परस्पर खरेदी झाल्याचे समजताच याचा पाठपुरावा केला. बनावट, खोटे दस्तऐवज निदर्शनास येताच आष्टी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात ३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यात तीन प्राध्यापक, एक मुख्याध्यापक, एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश असला तरी या प्रकरणातील जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली? महसूल दरबारी कोणी चकरा मारल्या? कोणत्या अधिकाऱ्यांला हाताशी धरले? याचा मास्टर माईंड कोण? हे शोधणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाला तर यातील मास्टर माईंड लवकरच गळाला लागतील, असे बोलले जात आहे.
दस्तगीर महंमद शेख यांनी आष्टी ठाण्यात ३ सप्टेंबर रोजी तक्रार दिली. त्यावरून प्रा. आजिनाथ त्र्यंबक बोडखे, मुख्याध्यापक सुरेश गहिनीनाथ बोडखे, प्रा. गोपीनाथ पांडुरंग बोडखे, (सर्व रा. आनंदवाडी), प्रा. शेख मुस्ताक बादशाह, सरपंच संजय भाऊसाहेब नालकोल, शरद नानाभाऊ पवार यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
...
चार जणांना अटक, कोठडी
प्रा. गोपीनाथ बोडखे, प्रा. आजिनाथ बोडखे, सरपंच संजय नालकोल, शरद पवार यांना अटक करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी त्यांना आष्टी न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
...