कोण म्हणतं फसवी, तर कोण चांगली; पण ‘लाडक्या बहिणीं’च्या मनात काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:08 PM2024-11-18T16:08:41+5:302024-11-18T16:09:14+5:30
महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच.
बीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. सध्या तरी प्रचारसभांमधून ‘लाडकी बहीण’ योजनेवरच भर दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे, तर महायुतीकडून ही योजना महिलांना आत्मनिर्भर करत असल्याचा दावा केला जात आहे. राजकारणी जरी वेगवेगळा दावा करत असले तर लाडक्या बहिणींच्या मनात काय? याचे उत्तर २३ नोव्हेंबरला निकालानंतरच समजेल. जिल्ह्यात १० लाख महिला मतदार असून १५ ऑक्टोबरपर्यंत ६ लाख २४ हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. त्यामुळे बहिणींच्या कल कोणाकडे? याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ आणण्यात आली. त्यानंतर बहिणींसाठी योजना आणल्याने सरकारवर टीका झाली. त्यामुळे सरकारने ‘लाडका भाऊ’ म्हणून तरुणांसाठीही योजना आणली. आता सरकारने नवीन आणलेल्या योजनांचाच पाढा प्रचारसभांमधून वाचला जात आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच. एवढेच नव्हे, तर कॉर्नर बैठका, गावभेटी, मतदारभेटींमध्येही महायुतीचे उमेदवार या योजनेची आठवण महिला मतदारांना करून देत आहेत. याचा प्रतिसादही त्यांना मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या छोट्या-माेठ्या सर्वच नेत्यांकडून या योजनेबद्दल आक्षेप नोंदवत ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना बंद पडणार, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे. आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कोणाला कौल देणार? त्या सुखी आहेत की नाराज? हे निकालानंतरच समजणार आहे. या याेजनेचा सरकाला फायदा होणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायक
जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान कमी असले तरी आमदार करण्यासाठी लाडक्या बहिणींचे मतदान हे निर्णायक असणार आहे. जिल्ह्यात एकूण २२ लाखांवर मतदार आहेत. पैकी १० लाख ५५ हजार महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांच्या मतदानावर सर्वांचाच डोळा आहे.
प्रमुख पक्षाकडून एकच महिला उमेदवार
महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आहे. शिंदे गटाला पहिल्यांदाच एकही जागा नाही. तर सातपैकी केवळ केजमध्ये नमिता मुंदडा यांच्या रूपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. इतर सहा ठिकाणी पुरुष उमेदवार आहेत. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आहेत. यामध्ये एकाही ठिकाणी महिलेला उमेदवारी नाही.
११ महिला उमेदवार मैदानात
जिल्ह्यात भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यासह इतर प्रमुख पक्षांसह अपक्ष अशा ११ महिला या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यात २८ वर्षांची तरुणी पूजा मोरे या देखील स्वराज्य पक्षाकडून गेवराई मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात लढत आहेत.
लाडकी बहीण योजनेची आकडेवारी (१५ ऑक्टोबरपर्यंत)
तालुका - एकूण अर्ज - पात्र
शिरूर कासार - ३३५५३ - ३२६६४
आष्टी - ६५९८८ - ६३०४१
पाटोदा - ५४५२८ - ३१२६७
बीड - १३७५३२ - ९८१०३
केज - ५९०९८ - ५६६५४
धारूर - ३१३८७ - २९८९८
गेवराई - ९६९१७ - ९३५९९
माजलगाव - ७०३८३ - ६५४८१
वडवणी - २४४३४ - २३२२६
परळी - ६८४८१ - ६४२९९
अंबाजोगाई - ६९६५६ - ६६६९६
एकूण - ७१२०५७ - ६२४९२८
मतदारसंघ पुरुष स्त्री तृतीयपंथी
गेवराई १९९८८९ १८००१७ ३
माजलगाव १८५८०६ १६६४७२ १
बीड २०२७२० १८१३७२ ९
आष्टी २०५३५६ १८१००१ १
केज २०२६२० १८४५९५ ६
परळी १७६०५० १६१९२२ ४
एकूण ११७२४४१ १०५५३७९ २४