‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय हाईच कोण?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:39 PM2020-02-12T23:39:39+5:302020-02-12T23:42:32+5:30
‘येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण’ ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी शहरातून काढलेल्या वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्यात आला.
बीड : ‘येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण’ ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी शहरातून काढलेल्या वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्यात आला.
पर्यावरण प्रेमी तथा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि वन विभागाच्या मदतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी बीडपासून जवळच असलेल्या पालवण रस्त्यावरील देवराई परिसरात देशातले पहिले वृक्ष संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून वृक्ष ठेवलेल्या पालखीला सयाजी शिंदे, आ. संदीप क्षीरसागर यांनी खांदा देत दिंडीला प्रारंभ केला. दिंडीत जवळपास २२ शाळांतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. वृक्षदिंडीत शाळकरी मुलींचे लेझीम पथक लक्षवेधी ठरले. शिक्षकांसह पर्यावरण प्रेमींनी यात सहभागी होत ताल धरला. छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मैदानावर दिंडीचा समारोप झाला. सिनेलेखक अरविंद जगताप, विभागीय वनाधिकारी मधुकर तेलंग, वनाधिकारी अमोल मुंडे, कृषीभूषण शिवराम घोडके, संतोष सोहनी, राजू शिंदे, प्राचार्या डॉ. सविता शेटे, वनाधिकारी सायमा पठाण, वनपाल मोरे, वनरक्ष सोनाली वनवे, मंगेश लोळगेसह शिक्षक, प्राध्यापक, पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.
वडाचं झाड अध्यक्ष
एखाद्या पक्षाबद्दल प्रेम वाटण्यापेक्षा पक्ष्यांबद्दल प्रेम बीड जिल्ह्यातील आबालवृद्धांना वाटावं, यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कोणती ? गुरूवारी आणि शुक्रवारी देवराईत वृक्ष संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद हे वडाच्या झाडाकडे आहे. हे अध्यक्षपद वर्षानुवर्षे त्यांच्याकडेच राहणार आहे. आपआपल्या गावात वृक्षांची लागवड करा, त्याची जोपासना करा, वाळवंटमय असलेल्या जिल्ह्याची ओळख पुसून काढा, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी वृक्षदिंडीच्या समारोपप्रसंगी केले.
वृक्ष सुंदरी स्पर्धेची उत्सुकता
पहिल्या वृक्ष संमेलनात अनोखी अशी वृक्ष सुंदरी स्पर्धा होत आहे. जिल्हाभरातील १०० महाविद्यालयीन तरूणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी, झाडे, वेली, पशू, पक्षी या विषयीचे ज्ञान यावर आधारीत ज्ञानचाचणी फेऱ्यातून तीन वृक्ष सुंदरींची निवड करण्यात येणार असून त्यांना ‘वृक्ष सुंदरी’ हा मुकूट देऊन गौरविण्यात येणार आहे.