पावसासाठी अख्खं गाव कोळाईच्या दरबारात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:13 AM2019-07-27T00:13:24+5:302019-07-27T00:13:54+5:30
पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे.
विजयकुमार गाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर छावण्या बंद झाल्याने दावणीवरचे जनावरे उपाशीपोटी हंबरडा फोडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. येईल येईल असा अंदाज पावसाने खोटा ठरवला. हतबल झालेले ग्रामस्थ अखेर ग्राम दैवताला साकडे घालण्यासाठी व शरणागती पत्करण्यासाठी निघाले. ‘आता तूच तारण हार’ या भावनेतून अख्खं गाव शुक्रवारी घराबाहेर पडून ग्राम दैवताच्या दरबारात धरणे धरून बसला होता. ज्या ज्या वेळी अशी दुष्काळ परिस्थती निर्माण झाली त्या त्या वेळी गाव असाच बाहेर पडत असल्याचे वयस्क ग्रामस्थ बोलत होते.
तालुक्यातील कोळवाडी गावात पश्चिमेला कोळाई हे ग्रामदैवत आहे. सिंदफणेच्या काठावर या लहान मंदिराच्या मागे शिळेचा मारुती व भुताचा राजा वेताळ ही दैवत उघड्यावर आहेत. जुलै संपत आलातरी पावसाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवल्याने गतवर्षीच्या दुष्काळ पोटी पुन्हा दुसरा दुष्काळ जन्म घेतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नद्या वाहण्याच्या काळात टँकरचे पाणी प्यावे लागते तर डोंगरावरील मोकळा हिरवा चारा खाऊन मस्तावलेल्या जनावरांचे हुंबरण्याऐवजी दावणीवरच जनावरांचा उपाशी पोटी हंबरडा ऐकू येत आहे. या संकटातून आता फक्त कोळाई हे दैवत एकमेव आधार वाटत असल्याने याही वर्षी हे ग्रामस्थ गाव रिकामं करून देवीच्या दरबात हजर झाले. कोळवाडीत सव्वादोनशे कुटुंब असून जवळपास पावणेदोन हजार लोकसंख्या आहे. शुक्रवारी गावातील प्रत्येक घरातून महिला, पुरुषांसह अबालवृद्ध मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.