नियुक्ती देता का नियुक्ती? राज्यातील ३५० कर्मचाऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:25+5:302021-07-17T04:26:25+5:30

सोमनाथ खताळ बीड : आरोग्य विभागाकडून पाठ्यनिर्देशिका, आरोग्य परिचारिका, बालरुग्ण तज्ज्ञ व मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या पदांसाठी परीक्षा घेतली. ...

Why appoint an appointment? Question of 350 employees in the state | नियुक्ती देता का नियुक्ती? राज्यातील ३५० कर्मचाऱ्यांचा सवाल

नियुक्ती देता का नियुक्ती? राज्यातील ३५० कर्मचाऱ्यांचा सवाल

Next

सोमनाथ खताळ

बीड : आरोग्य विभागाकडून पाठ्यनिर्देशिका, आरोग्य परिचारिका, बालरुग्ण तज्ज्ञ व मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या पदांसाठी परीक्षा घेतली. त्याचा निकालही लागला; परंतु अद्यापही ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिलेली नाही. ‘आम्हांला नियुक्ती देता का नियुक्ती?’ अशी ओरड कर्मचाऱ्यांमधून होत आहे. तसेच काही कर्मचारी न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजते. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

उपसंचालक आरोग्य सेवा (शुश्रूषा) मुंबई अंतर्गत पाठ्यनिर्देशिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका या पदांसाठी जाहिरात निघाली होती. त्यानंतर १८ जानेवारी २०२१ रोजी पुन्हा सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली केली होती. याच जाहिरातीच्या अनुषंगाने २८ फेब्रुवारी २०२१ रोजी या सर्व पदासाठी परीक्षा घेण्यात आली. १६ मार्च २०२१ रोजी याचा निकाल जाहीर झाला. आता चार महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी पात्र उमेदवारांना आरोग्य सेवा विभागाकडून अद्याप नियुक्ती दिलेली नाही. काही ठरावीक कर्मचारी या लोकांची भरती करण्याऐवजी आम्हालाच पदोन्नती द्यावी, अशी मागणी करीत आहेत. आरोग्य सेवेतील काही वरिष्ठ अधिकारीही त्यांच्याशी संगनमत करून पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप उमेदवारांमधून केला जात आहे.

दरम्यान, याबाबत आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांना संपर्क केला असता त्यांनी हा विषय आपल्या अखत्यारीत नाही. डॉ. अर्चना पाटील यांना विचारा असे सांगितले. डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला; परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही.

--

म्हणे, सेवाप्रवेश नियमांत बदल !

या पदांची जाहिरात ही २०१९ मधील आहे. तरीही परीक्षेच्या आदल्या दिवशीच म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढून नियमांत बदल केल्याचे सांगितले; परंतु ही पदभरती अगोदरची असून शासन आणि अधिकारी ही पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नवीन नियमांनुसार पदभरती करून स्वतंत्रपणे समुपदेशन करू, अशी समज देणाऱ्या सूचना १९ एप्रिल रोजी वेबसाईटद्वारे दिल्या आहेत; परंतु याबद्दल तीव्र नाराजी आहे.

यांना नियुक्तीची प्रतीक्षा

पाठ्यनिर्देशिका १५१

सार्वजनिक आरोग्य परिचारिका ७७

बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका ७३

मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका ४९

Web Title: Why appoint an appointment? Question of 350 employees in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.