चोरी, अवैध धंदे का वाढले? एसपींनी मागविला वडवणी पोलिसांकडून खुलासा
By सोमनाथ खताळ | Published: August 19, 2022 04:15 PM2022-08-19T16:15:57+5:302022-08-19T16:17:11+5:30
पोलीस ठाण्याच्या समोरच असलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. ठाण्यासमोरच चाेरटे डाव साधत असल्याने पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता.
बीड : वडवणी शहरासह ग्रामीण भागातील अवैध धंदे, चोरी रोखण्यासह झालेल्या चोऱ्यांचा तपास करण्यात वडवणी पोलीसांना अपयश येत आहे. याच घटनांना अनुसरून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वडवणी पोलिसांकडून याबाबतचा खुलासा मागविणार आहेत. शुक्रवारी ठाकूर यांनी याबाबत लोकमतला माहिती दिली. त्यामुळे वडवणीचे ठाणेदार अडचणीत आले आहेत.
वडवणी शहरात दोन आठवड्यांपूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. आगोदर मुख्य महामार्गालगतचे दुकान फोडून रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या समोरच असलेले दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला. ठाण्यासमोरच चाेरटे डाव साधत असल्याने पोलिसांचा वचक आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. यातील चोरटे माेकाट असतानाच पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका किराणा दुकानातून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटखा जप्त केला. यावरून शहरात वचक नसल्याचे दिसत होते. ही चर्चा बंद होत नाही तोच आता ग्रामीण भागातही चोरटे सक्रीय झाले आहेत. वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी डाव साधत दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. या वाढत्या चोऱ्या, अवैध धंदे यामुळे वडवणी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. वडवणीचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुने यांना याबाबत खुलासा विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता हा खुलासा देताना कांगुणे कसा बचाव करतात, याकडे लक्ष लागले आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
वडवणीतील प्रकार कानावर आले आहेत. चोरी, अवैध धंदे याबाबत खुलासा मागविला जाईल.
- नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक बीड
पहिल्या चोरीचा तपास सुरूच आहे. दुकडेगावमध्येही चोरी झाली आहे. १० तोळे सोने गेल्याचे ते सांगत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- आनंद कांगुणे, सहायक पोलीस निरीक्षक वडवणी