वाळूमाफियांवर चोरीचे गुन्हे का दाखल केले नाहीत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:33 PM2019-05-06T14:33:27+5:302019-05-06T14:36:17+5:30
महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासाठी नोटिसा जारी
बीड : गेवराई तालुक्यातील राजापूर येथे २२०० पेक्षा अधिक ब्रास वाळूसाठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी धाड टाकत मोठ्या प्रमाणात वाळू जप्त केली आहे. त्यानंतर या विभागाशी संबंधित सर्व महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत, तर वाळूतस्करीच्या प्रकरणात चोरीचे गुन्हे दाखल का केले नाहीत, अशी विचारणा महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली आहे. मात्र, या मागील वर्षभरात ३२५ वाळूमाफियांवर कारवाई केली असली, तरी यापैकी १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच फक्त दोघांना अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरून वाळूमाफिया आणि महसूल व पोलीस प्रशासनातील साटेलोटे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अवैध वाळू उपसा व वाहतूक हा विषय जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अजेंड्यावर आहे. बीड जिल्ह्यात वाळूचा धंदा हा सर्वाधिक फायद्याचा धंदा ठरलेला असल्याने या धंद्याची मोठी साखळी सक्रिय आहे. यात राजकीय पुढारी, कार्यकर्ते, पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राजापूर येथील हजारो ब्रास वाळुसाठा जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. वाळू माफियांवर मकोकानुसार (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई करणे, एमपीडीएचे अस्त्र वापरणे या ऐवजी पोलीस आणि महसुलचा भर केवळ दंड वसुलीवर राहिला आहे. त्यातही दंड आकारण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आणि किती वाळू पकडली हे पोलीस कळवणार, क्वचित काही ठिकाणी अत्याधुनिक तंत्राद्वारे मोजणी करण्यात येत होती. नाहीतर बहुतांश ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहारामुळे दंडात्मक कारवायांना देखील फाटा दिला जात होता. राजापूर वाळू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे अधिकारी व पोलीस प्रशासनाातील संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्व लक्ष लागले आहे.
मारहाण झाली म्हणून गुन्हे दाखल केले
ज्या प्रकरणामध्ये थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाळूमाफियांनी मारहाण केली. त्यामध्येच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि १७ गुन्हे दाखल झाल्यानंतरही अटक आरोपींची संख्या मात्र केवळ २ आहे. दंडवसुली मात्र, ४ कोटी ८६ लाखाची करीत मराठवाड्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. इतका दंड भरून तस्करांनी गोदावरी, सिंदफनेसह अनेक नद्यांची चाळणी करून कितीतरी कोटी रुपयांची मालमत्ता कमावली आणि पर्यावरणाचा ऱ्हास केला याचे मात्र कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.