लातूरला शक्य ते आष्टीला का जमत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:50+5:302021-07-23T04:20:50+5:30
आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ ...
आष्टी : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी शाळेच्या वेळेनंतर दोन तास जास्त शिक्षण दिले तर काय होईल? लातूरसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची आठ-आठ दिवसाला परीक्षा घेतली जाते. लातूरला शक्य आहे तर आष्टीच्या शिक्षकाला का जमत नाही? आष्टीची गुणवत्ता अजून वाढविण्यासाठी शिक्षकांनी आपला जास्तीचा वेळ द्यावा, असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले.
तालुक्यातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २१ जुलै रोजी पार पडला. या कार्यक्रमात आ. सुरेश धस बोलत होते. यावेळी प्रफुल्ल सहस्रबुद्धे, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, आष्टी तालुका दूध संघाचे व्हा. चेअरमन आत्माराम फुंदे, आरती ससाणे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी आ. धस यांनी १२० गुणवंतापैकी ७५ मुली असल्याने विशेष कौतुक केले. तालुक्यातील वसुंधरा शाळेतील १५ मुलींनी शंभर टक्के, जि.प. कन्या शाळेच्या १६ मुलींनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर गणेश विद्यालयातील नऊ विद्यार्थिनींनी आऊट ऑफ मार्क घेतले आहेत. या यशाचे गमक त्या शाळेतील शिक्षकांपासून शिपायांपर्यंत सर्वांचे यश असल्याचे धस म्हणाले. गुणवत्तेचा आष्टी पॅटर्न करण्यासाठी सर्व शिक्षकांनी जबाबदारी घेतल्यास कितीही खर्च आल्यास ते पेलण्याची तयारी त्यांनी दर्शविली. यावेळी मनोज धस, भारत मुरकुटे, सुनील रेडेकर, मनोज सुरवसे, सुरेश पवार, बापू शिंदे, संपत शेळके, बाळासाहेब घोडके आदी उपस्थित होते.
एकशे वीस गुणवंतांचा सन्मान
दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील सुमारे एकशे वीस विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आ. सुरेश धस यांनी फेटा बांधून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
220721\22bed_10_22072021_14.jpg