'आपल्यावर गुन्हा का नोंदवू नये'; न्यायाधीशांना एपीआय नितीन मिरकरांनीच नोटीस धाडल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 06:29 PM2022-01-01T18:29:46+5:302022-01-01T18:30:19+5:30
वडवणी ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणात कलम १५६ (३) नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी, असे आदेश १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते.
बीड : वडवणी ठाण्याचे सहायक निरीक्षक नितीन मिरकर यांनी चक्क वडवणीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना आपल्यावर गुन्हा का नोंद करू नये, अशी नोटीस बजावल्याचा प्रकार २० नोव्हेंबरला उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांनी ही नोटीस अधिकृत नाही, असा दावा केला होता. मात्र, मिरकरांनीच नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहाराच्या नोंदींचा पुरावा ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.
वडवणी ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणात कलम १५६ (३) नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करावी, असे आदेश १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. दोन महिन्यांत तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशावर २३ सप्टेंबर २०२१ पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. या आदेशाचा संदर्भ देत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना वडवणीचे सहायक निरीक्षक नितीन मिरकर यांनी दिरंगाई केल्याचा ठपका ठेऊन गोपनीय अहवाल पाठविला. वडवणी ठाण्याच्या अभिलेख्यावर १२ फेब्रुवारी ते १ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान न्यायालयीन आदेशाचे पत्रच प्राप्त झालेले नाही, असा खुलासा करत नितीन मिरकर यांनी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना नोटीस बजावली . ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ती अधिकृत नसल्याचा दावा सहायक निरीक्षक नितीन मिरकरांनी केला होता. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे निर्देश दिले होते. तथापि, नितीन मिरकर यांच्या नावाने संकेतस्थळावर पाठवलेल्या नोटीसचे पुरावे ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे ठाण्याच्या शिक्क्याचा तसेच स्वाक्षरी बनावट असल्याचा दावा करणाऱ्या मिरकरांनी अजून गुन्हा देखील नोंदविलेला नाही. त्यामुळे मिरकर संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
योग्य ती कारवाई करू
न्यायाधीशांना पाठविलेली नोटीस अधिकृत आहे किंवा नाही, हे चौकशीतून समोर येईल. अंबाजोगाई उपअधीक्षकांकडे चौकशी दिलेली आहे, अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
मी पाठविलेले पत्र वेगळे
आमच्याकडून समन्स जरी झालेले नाही. आपण जारी केले आहे, म्हणताय तर केलेचे असेल, मी पत्र पाठविले ते वेगळे आहे. असं काही पत्र आठवत असेल तर कोर्टाला विचारून घ्या. आम्ही दिलेही नाही आणि गेलेही नाही. आवकजावकल जी नोंद आहे, ते वेगळे आहे. जे पत्र पाठविले ते १९ तारखेचे आहे. व्हायरल पत्र हे १७ तारखेचे आहे. १९ तारखेचे पत्रात तुम्ही जो अहवाल पाठविला आहे, त्याबाबत फेरविचार करावा, याबाबत न्यायालयाला कळविले आहे. योग्य तो अहव्ल देऊन वरिष्ठांना कळवावे, असे सांगितले आहे.
- नितीन मिरकर, सपोनी, पोलीस ठाणे, वडवणी