जारचे गार पाणी पिऊन कोरोनाला आमंत्रण कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:21+5:302021-05-06T04:35:21+5:30

बीड : जारचे गार पाणी पिऊन कोरोनाला आमंत्रण कशाला? या मानसिकतेतून अनेकांनी जारचे पाणी पिण्याचे टाळले आहे. यातच वर्षभरापासून ...

Why invite Corona to drink cold water from a jar? | जारचे गार पाणी पिऊन कोरोनाला आमंत्रण कशाला?

जारचे गार पाणी पिऊन कोरोनाला आमंत्रण कशाला?

Next

बीड : जारचे गार पाणी पिऊन कोरोनाला आमंत्रण कशाला? या मानसिकतेतून अनेकांनी जारचे पाणी पिण्याचे टाळले आहे. यातच वर्षभरापासून शासन व प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसल्याने तसेच मार्चपासून लॉकडाऊन सुरू असल्याने जारच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे या व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास अडीचशे जार व्यावसायिकांसह एकहजार कामगारांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पाणी टंचाईच्या काळात व एरव्ही तहान भागविण्यासाठी जारच्या पाण्याला मागील काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणारा अनियमित, अपुरा तसेच अशुध्द पाणीपुरवठा हेही एक कारण राहिले आहे. यातच अनेक बेरोजगारांनी गुंतवणूक करीत आरओ वॉटर प्लांटच्या माध्यमातून आपला व्यवसाय सुरू केला. बीड शहर व लगतच्या भागात जवळपास १५० आरओ वॉटर प्लांट आहेत. मागील पाच वर्षांपासून हा उद्योग भरभराटीला आला. दुष्काळाच्या काळात आरओ वॉटरवरच बीडकरांची तहान भागली. मात्र मागीलवर्षी कोराना संसर्गामुळे झालेले लॉकडाऊन या व्यवसायाला अडथळा आणणारे ठरले. सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती, तर सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध हाेते. लग्नातील उपस्थितीच्या मर्यादेमुळे विवाह सोहळे आटोपते झाले. त्यामुळे लग्नसराईत असणारी मागणी मोठ्या प्रमाणात घटली. यातच अतिथंड जारचे पाणी आरोग्यावर परिणाम करू शकते. कोराेनाच्या काळात हे पाणी नको म्हणून अनेकांनी हे पाणी पिण्याचे सोडले. घरच्या फिल्टरद्वारे शुध्द केलेल्या पाण्याला त्यांनी पसंती दिली. यंदाही कोरोनाच्या उद्रेकामुळे प्रतिबंधात्मक नियम लागू असल्याने मोठ्या स्वरूपात होणारी लग्ने, सप्ताह, सार्वजनिक कार्यक्रम नसल्याने तसेच दुकाने बंद असल्याने जारच्या पाण्याची मागणी आणखी घटली. जी दुकाने, व्यवसाय चालू आहेत, त्या ठिकाणी एरव्ही दर्शनी भागात असणारे जार सुरक्षेच्या दृष्टीने ठराविक ठिकाणी ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

------

नगरपालिका अन्न व औषध प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण या तिन्ही विभागांमार्फत आरओ वॉटर प्लांटला परवानगी देण्याचे अधिकार नाहीत. हे कार्य त्यांच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगण्यात आले. सूक्ष्म अणुजीव प्रयोगशाळेतून तपासणीनंतर ‘पाणी पिण्यास योग्य’ या प्रमाणपत्राच्याआधारे जिल्ह्यातील पाण्याचा धंदा सुरू आहे. शहरातील दीडशे प्लांटमधून दररोज जवळपास दोन लाख लिटर पाण्याची विक्री कोराेनाच्या आधी होत होती. असे असले तरी या पाण्यामुळे आजार झाल्याचे एकही प्रकरण सार्वजनिक पटलावर उमटलेले नाही. मात्र य पाण्याची मागणी आता घटल्याचे दिसत आहे.

-------

जीवनधाराचा आधार

बीड नगर परिषदेमार्फत आरओ वॉटरची सहा वाहनांद्वारे मोबाईल सेवा सुरू केली आहे. सध्या व्यावसायिकांच्या जारचे पाणी टाळून नगर परिषदेच्या एटीएम वॉटरला चांगली मागणी व प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. दिवसभरातून २० ते २५ हजार लिटर पाणी विकले जाते, अशी माहिती संबंधित वाहनचालकांनी दिली.

---------

मागील वर्षापासून जारच्या पाण्याची मागणी कमालीची घटली आहे. मोठी गुंतवणूक करून रोजगार व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय सुरू केला; मात्र कोरोनामुळे अनेकजण जारचे पाणी पिण्याचे टाळत आहेत. तर नगर परिषदेचे मोबाईल व्हॅनचे पाणी ग्राहक घेत आहेत. लग्न, सप्ताह, मोठ्या उपस्थितीचे कार्यक्रम बंद असल्याने जारच्या पाणी व्यवसायावर परिणाम झाला आहे. - मुकुंद पारिख, जार व्यावासायिक, बीड.

------

मी ग्राहकांसाठी जारचे पाणी घेतो. सध्या येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रमाणही कमी केले आहे. मात्र स्वत: जारचे पाणी पिणे बंद केले आहे. घरचे पाणी स्वतंत्र आणून तहान भागवताे. कोरोना परिस्थितीमुळे काळजी घेत आहे. - किशोर शिराळे, केमिस्ट, बीड.

--------

स्वत: घरचे फिल्टर पाणी पितो. नेहमी सोबत ठेवतो. आरोग्याच्या दृष्टीने बाहेरचे पाणी दहा वर्षांपासून पित नाही. कोरोनामुळे जारचे पाणी अपायकारकच आहे. परंतु दुकानात मुनीम व ग्राहकांसाठी साेय म्हणून जारचे पाणी घेतो. - कैलास मानधने, किराणा व्यापारी, बीड.

--------

शहरात जारचे पाणी निर्मितीचे प्रकल्प - १५०

२०१९ मध्ये होणारी विक्री २,००,००० लिटर

२०२० मध्ये झालेली विक्री १,५०,०००

२०२१ मध्ये झालेली विक्री ७०,०००

७५ टक्के घटली जारची मागणी

Web Title: Why invite Corona to drink cold water from a jar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.