वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का नको?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 04:46 PM2020-02-15T16:46:57+5:302020-02-15T16:49:35+5:30
निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले.
बीड : वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. वडाची कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये, यासह निसर्ग संवर्धनासाठीचे ११ ठराव पहिल्या वृक्ष संमेलनात सह्याद्री देवराई सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकमताने मंजूर केले. बीडजवळ पालवन परिसरात गुरुवारपासून सुरू झालेल्या वृक्षसंमेलनाच्या समारोपावेळी सह्याद्री देवराई संस्थेचे धनंजय शेडबाळे यांनी या ठरावांचे वाचन केले. व्यासपीठावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे, सिनेलेखक अरविंद जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष संमेलनात निसर्ग संवर्धनासाठी ठराव
1. महाराष्ट्रातील परंपरागत जपलेल्या देवराया संरिक्षत म्हणून जाहीर करून त्यांचे संवर्धन करावे
2. वड आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याची महानता अबाधित ठेवणे आपले आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्या तोडीस बंदी घालावी. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर, कत्तल करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा खटला का दाखल करू नये?
3. महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेनुसार जे वातावरणीय विभाग पडतात त्या भागांतील स्थानिक वृक्ष, वनस्पती यांचाच वृक्षारोपणात समावेश करावा
4. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा आहे आणि ताम्हण (जारूळ) राज्यफुल आहे. ही दोन्ही झाडे राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय परिसरात लावण्यात यावीत.
5. राज्यातील सर्व गवताळ कुरणे, पाणथळ जागा, तळी यांचे संरक्षण करावे आणि संवर्धन करावे.
6. राज्यातील सर्व शहरे, गावांत पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करावे आणि सर्व सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी रोपे, झाडे लावून ते वाढवण्यासाठी वापरात आणावे.
7. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वाणाचे (जसे धान्य, वृक्ष, वनस्पती, भाज्या, कडधान्ये, गवत इत्यादी) बीजसंकलन करून त्याची सिडबँक तयार करावी व त्याचे संवर्धन करावे.
8. वाढते शहरीकरण, विकास कामे, संरक्षित वनात रस्त्यांचे विस्तारीकरण, रु ंदीकरण, घाटरस्ते आदी कारणांमुळे जंगले तुटली आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. त्यांच्यासाठी हक्काचे वाइल्ड कॉरिडोर शासनाने त्वरित करावेत.
9. शाळेत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना देशी रोप देऊन ते वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे. त्या रोपांचा दरवर्षी आढावा घ्यावा. शेवटच्या वर्षी त्याला यासाठी खास गुण द्यावेत.
10. राज्यातील सध्या बहुतेक सर्व शाळांमधून परदेशी वृक्ष (गुलमोहर, अशोक, निलिगरी वगैरे) लावलेले आहेत. इथून पुढे फक्त देशी वृक्ष (उदा. बहावा, बकुळ, पारिजातक, ताम्हण वगैरे) लावावेत.
11. राज्यातील प्रत्येक तालुक्यात जैवविविधता उद्यान उभे करावे.