शहरी, ग्रामीण भेदभाव का? बीडमध्ये मुलांना मिळतोय फक्त तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:23+5:302021-02-10T04:34:23+5:30

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ ...

Why urban, rural discrimination? In Beed, children get only rice | शहरी, ग्रामीण भेदभाव का? बीडमध्ये मुलांना मिळतोय फक्त तांदूळ

शहरी, ग्रामीण भेदभाव का? बीडमध्ये मुलांना मिळतोय फक्त तांदूळ

Next

इयत्ता पहिली ते आठवीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ, डाळी, कडधान्याचे वाटप केले जाते. कोविड-१९ पासून शासनाच्या निर्देशानुसार वाटपाचे दिवस व प्रमाण देण्यात येते. तर शिक्षण विभाग अंमलबजावणी करत असते.

शाळेत पालकांना बोलावून नियोजनानुसार आहार वाटप केले जाते. दिव्यांग विद्यार्थ्यांना घरपोच आहार वाटपाच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांमार्फत आहार वाटप केले जात आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर शाळा पातळीवर आहार वाटपाचे नियोजन केले जात असून जानेवारीपर्यंत आहार वाटप झाल्याचे सांगण्यात आले.

-------------

बीड पॅटर्न ठरला आदर्श

लॉकडाऊन काळात शालेय पोषण आहार वाटपाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचना होत्या. स्थानिक प्रशासन व आपत्ती प्राधिकरणाच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात शालेय पोषण आहार वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. हे काम उत्कृष्ट झाल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करीत बीडचा पॅटर्न अन्य जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला.

---------

बीड शहरात केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या (सेंट्रलाइज किचनशेड) ७५ शाळा आहेत. शासनाच्या सूचनेनुसार या शाळांच्या विद्यार्थ्यांना फक्त तांदूळ वाटप केले जात आहे. या शाळा वगळता अन्य सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप होत आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत पहिली ते आठवीच्या वर्गातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, या दृष्टीने पुरवठा आणि वितरणाचे संनियंत्रण करण्यात येते. कुठल्याही तक्रारी नाहीत. - अजय बहीर, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जि. प. बीड.

------

भेदभाव नको

सेंट्रलाइज किचनशेड असो वा नसो सर्वच विद्यार्थ्यांना पोषण आहारात तांदूळ, कडधान्य, डाळींचे वाटप व्हायला हवे. शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव शासन कशासाठी करते ? असा सवाल काही पालकांनी केला.

-----

शाळांमध्येही मापचोरी

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार प्रतिविद्यार्थी प्रमाण ठरवून दिलेले असते. मात्र बहुतांश शाळांमध्ये वाटप करताना वजनमाप न करता भांडे किंवा डब्याचा माप करून वाटप केले जाते. यात अनेकदा आहार शिल्लक राहतो. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अशी मापचोरी होत असून या बाबींवर नियंत्रणाची गरज आहे.

---------

शालेय पोषण आहार बीड जिल्हा

एकूण लाभार्थी ३, ३६, ४९५

ग्रामीण लाभार्थी २,५१,९६०

शहरी लाभार्थी ८४, ५३५

---------

पहिली ते पाचवी

शहरी ५०८२७

ग्रामीण १,५९, २१५

सहावी ते आठवी

शहरी ३३७०८

ग्रामीण ९२७४५

------------

Web Title: Why urban, rural discrimination? In Beed, children get only rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.