आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 04:06 PM2023-10-30T16:06:38+5:302023-10-30T16:10:35+5:30
आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ आंदोलकांनी दगडफेक केली.
बीड- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे नेत्यांना गावबंदीही केली आहे. यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. आ.सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली, आता ही ऑडियो क्लिप समोर आली आहे.
Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या
आज सकाळी आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ उभ्या असलेल्या गाड्याही जाळल्या. काही दिवसापूर्वी सोळंके यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यात आमदार प्रकाश सोळंके एका व्यक्तीसोबत आरक्षणा संदर्भात बोलत असल्याचे दिसत आहे. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. ही दगडफेक दीड तास सुरू होती. यावेळी बंगल्या जवळ लावण्यात आलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या आहेत.
व्हायरल क्लिपमध्ये संभाषण नेमकं काय आहे?
आमदार प्रकाश सोळंके यांना एका आंदोलकाने फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने आरक्षणाच्या मुदतीच्या ४० दिवसांची आठवण करुन दिली. यावेळी बोलताना प्रकाश सोळंकी म्हणाले की, "कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झाले? हे आरक्षण देऊन कोर्टात परत अडकवून ठेवायचं का? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टीकले पाहिजे, एवढेच शासनाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करत आहे. शासनाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे", असं यात म्हटले आहे, पुढे बोलताना त्या व्यक्तीने सरकारला दिलेल्या मुदतीची आठवण करुन दिली. आपण दहा दिवस बोनस दिले होते, यावर आमदार सोळंके म्हणाले ‘बोनस देणाराही महाहुशार माणूस, बोनस द्यायचे म्हणजे, कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढविली नाही, पण आता हा सगळ्यात हुशार माणूस झालाय" असे आमदार सोळंके म्हणाले. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बीड: मराठा आरक्षण समर्थनार्थ माजलगाव बंद दरम्यान राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर आंदोलकांची दगडफेक, गाड्या पेटविल्या. #MarathaReservationpic.twitter.com/ZOE5OQfU8J
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 30, 2023