मी असताना बायको कशाला? व्यसनमुक्ती केंद्रात एचआयव्ही बाधित महिलेकडून रुग्णांचे शोषण
By सोमनाथ खताळ | Published: March 14, 2023 07:51 PM2023-03-14T19:51:18+5:302023-03-14T20:03:48+5:30
न ऐकणाऱ्यांना बेदम मार; नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील आणखी एक कारनामा चव्हाट्यावर
बीड : 'मी असताना तुम्हाला बायकोची गजर काय? तुम्ही इथेच माझ्यापशी रहा' असे म्हणून एचआयव्ही बाधित महिला कर्मचारी उपचार घेणाऱ्या लोकांना 'सेक्स'साठी उत्तेजित करत असल्याचे समोर आले आहे. तसे न केल्यास इतर लोकांकडून त्यांना मार दिला जात होता. याचा एक कथीत व्हिडीओ देखील 'लोकमत'च्या हाती लागला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील दररोज एक नवीन कारनामा चव्हाट्यावर येऊ लागला आहे. आता यात कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेनेही केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी मानसिक आरोग्य केंद्राकडे मार्गदर्शनही मागविले आहे.
अंबाजोगाई येथील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात एका महिला डॉक्टरकडे शरिर सुखाची मागणी करण्यात आली होती. पीडितेने जिल्हाधिकारी, अपर अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात राजकुमार सोपान गवळे (रा. पाटोदा, जि.लातूर), अंजली बाबूराव पाटील (रा. नवजीवन व्यसमुक्ती केंद्र वाघाळा ता. अंबाजोगाई), ओम डोलारे (रा.अंबाजोगाई) यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लगेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी स्वतंत्र पथके तयार करून बीड, केज व अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा व मोरेवाडी केंद्रांवर छापे मारले होते. यात मुदतबाह्य औषधी, डॉक्टरांची अनुपस्थिती, अप्रशिक्षित कर्मचारी, अस्वच्छता आदी त्रूटी आढळल्या होत्या. हे सर्व केंद्र सील करण्यात आले होते. तसेच यावर पुढील कारवाईसाठी डॉ.साबळे यांनी राज्य मानसिक आरोग्य केंद्राकडे मार्गदर्शन मागविले आहे. तसेच जिल्हा न्यायालया, पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अहवालही माहितीस्तव सादर केला आहे. आता यावर काय मार्गदर्शन येते, याकडे लक्ष लागले आहे.
५ जणांनी हात-पाय धरले, एकाने काठीने मारले
नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातीलच एक मारहाणीचा व्हिडीओ 'लाेकमत'च्या हाती लागला आहे. यात याच केंद्रात दाखल असलेले पाच लाेक एका व्यक्तिला पकडतात तर एक जण काठीने पार्श्वभागावर जोरात मारत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार केंद्रातील इतर रूग्ण पहात असल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. असेच प्रकार इतर केंद्रातही सर्रास होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
झोपेच्या गोळ्या देऊन अश्लिल चाळे
केंद्रात दाखल असलेल्या रूग्णांना मुदतबाह्य औषधी दिली जातात. तसेच त्रास देणाऱ्या, ओरडणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या दिल्या जात होत्या. त्यांच्यासोबत नंतर अश्लिल चाळेही केले जात होते, असे समजते. तर एका तक्रारीत एचआयव्हीबाधित महिला या रूग्णांना 'सेक्स'साठी उत्तेजीत करत होती, असे म्हटले आहे.
सविस्तर अहवाल पाठवला
आम्ही केलेल्या चारही कारवायांचा सविस्तर अहवाल तयार करून मानसिक आरोग्य केंद्राच्या सीईओंना पाठवला आहे. त्यांच्याकडून पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन मागविले आहे. तसेच मुख्य न्याय दंडाधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरोग्य संचालकांनाही माहितीस्तव एक प्रत दिली आहे. आता मार्गदर्शन येताच पुढील कारवाई केली जाईल.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
युवा सेनेनीही उठवला आवाज
पीडित डॉक्टर महिलेवरील अत्याचाराविरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे यांनीही आवाज उठविला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकनकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर कारवाई होताच याचे काही पुरावे त्यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना दिले आहेत. यावर तात्काळ कारवाई न झाल्यास १५ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच सोमवारी दोन व्यक्तींनीही एक तक्रार मुधोळ यांच्याकडे केली आहे.