चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कत्तीने वार करून हत्या; पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:29 PM2020-11-19T19:29:29+5:302020-11-19T19:31:17+5:30
या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिरसाळा : हात मोडल्याने पत्नी दोन महिन्यांपासून माहेरी थांबली होती. तिला सासरी बोलावूनदेखील येत नव्हती. याचा राग मनात धरत तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर कत्तीने सपासप वार केले व पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन केले. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना परळी तालुक्यातील बोधेगाव येथे सोमवारी दुपारी घडली.
ज्ञानेश्वरी धनराज ऊर्फ योगीराज सोनवर (२७, रा. होळ, ता. केज) असे त्या मृत पत्नीचे नाव आहे. परळी तालुक्यातील बोधेगाव येथील ज्ञानेश्वरीचा विवाह सहा वर्षांपूर्वी होळ येथील धनराज ऊर्फ योगीराज वनराज सोनवर याच्यासोबत झाला होता. या दाम्पत्याला एक ५ वर्षांची मुलगी आणि ३ वर्षांचा एक मुलगा आहे. काही महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वरी आणि धनराज औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. तिथे दोन महिन्यांपूर्वी पाय घसरून पडल्याने ज्ञानेश्वरीचा हात मोडला. त्यानंतर ती राहण्यासाठी बोधेगावला माहेरी घरी आली होती.
सोमवारी दुपारी धनराज बोधेगावला आला. सासुरवाडीत ज्ञानेश्वरीचा भाऊ वैजनाथने धनराज सोबत जेवण केले आणि शेळ्या चारण्यासाठी निघून गेला. दुपारी ४ वाजता धनराज पुन्हा सासुरवाडीच्या घरी आला. सासरी नांदण्यास का येत नाहीस, असे म्हणत त्याने चारित्र्यावर संशय घेत ज्ञानेश्वरीला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागात धनराजने धारदार कत्तीने ज्ञानेश्वरीच्या गळ्यावर, मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ज्ञानेश्वरीची बहीण कल्पना शामराव सोडगीर यांच्या फिर्यादीवरून धनराज सोनवर याच्यावर सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक डोंगरे करीत आहेत.
पतीवर रुग्णालयात उपचार सुरू
ज्ञानेश्वरीवर वार केल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यावेळी तिची बहीण कल्पना हिने ते पाहिले व आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे नातेवाईक धावत आले. यावेळी धनराजने सर्वांसमोर स्वत: आणलेल्या बाटलीतील विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी अत्यवस्थ झालेल्या धनराजला उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांची माहिती आहे.