अनैतिक संबंधातील महिलेसोबत लग्न करण्यासाठी पत्नीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:30 AM2018-06-21T00:30:03+5:302018-06-21T00:30:03+5:30
पाटोदा : स्वत:चे अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पतीने पत्नीचा सातत्याने छळ केला. यात त्याच्या कुटुंबियांनीही त्याला साथ दिली. अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे सदरील प्रकरण घडले.
डोंगरकिन्ही येथील सारिकाचे लग्न दीड वर्षापूर्वी अमळनेर येथील नामदेव रामा तांबारे याच्यासोबत झाले. लग्नानंतर पहिले तीन महिने सुखात गेले. त्यानंतर पती नामदेव याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सारिकाच्या लक्षात आल्याने दोघांत वाद होऊ लागले. नामदेवने अनैतिक संबंध तोडण्यास सपशेल नकार दिला.
अखेर सारिकाने पतीच्या संबंधाविषयी माहेरी आणि सासरच्या लोकांना कल्पना दिली. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिला तुज्या लग्नात काहीच वस्तू अथवा हुंडा दिला नाही, त्यामुळे आता जेसीबी मशीनचे हप्ते भरण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ सुरू केला. परंतु, माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सारिकाने पैसे घेऊन येण्यास त्यांना नकार दिला होता.
त्यानंतर सारिकाला सतत मारहाण करण्यात येऊ लागली. यावर्षी २९ मार्च रोजी नामदेव आणि ‘त्या' महिलेने सारिकाला तुज्यामुळे आम्हाला लग्न करता येत नाही म्हणून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि सासू, नणंदा यांच्या मदतीने तिला बेदम मारहाण करून दहा महिन्यांच्या मुलासहित घराबाहेर काढले.
नामदेवचे लग्न त्या महिलेसोबत लावायचे असल्याने तुझी गरज नाही, असे तिला सांगण्यात आले. या घटनेनंतर सारिकाच्या आईवडिलांनी अंमळनेर येथे जाऊन बैठक घेऊन तिला नांदविण्याविषयी विनंती केली, परंतु नामदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी साफ नकार दिला. यावर सारिकाने बीड येथील महिला तक्रार निवारण केंद्रात देखील अर्ज केला होता, तिथेही सासरच्या लोकांनी तिला नांदविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.
अखेर सारिकाने अंमळनेर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पती नामदेव रामा तांबारे, सासू भागूबाई रामा तांबारे, नणंद कविता रावसाहेब बेदरे, कौसाबाई सुरेश पोकळे,
सुरेश अण्णा पोकळे, रावसाहेब रामकिसन बेदरे आणि दीपा हरि पोकळे (सर्व रा. अंमळनेर) या
सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.