पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:15 AM2018-11-20T00:15:48+5:302018-11-20T00:16:39+5:30
चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा डोक्यात पाटा घालून खून केल्याची घटना आष्टी येथे घडली होती. यामध्ये आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. न्या. आर. व्ही. हुद्दार यांनी हा निकाल दिला.
१२ आॅगस्ट २०१७ रोजी पहाटेच्या सुमारास संतोष प्रल्हाद कदम याने पत्नी सविता उर्फ सुनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत पहाटेच्या सुमारास झोपेत असताना डोक्यात पाटा घालून खून केला होता. पाट्याच्या आपटण्याचा आवाज ऐकून सविताची सासू व दीर जागे झाले. त्यांनी जिन्याकडे धाव घेतली. यावेळी संतोष हा पाटा घेऊन खाली येताना दिसला. यावर संतोषच्या आईने विचारले असता, सुपारी फोडण्यासाठी पाटा घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर आई जिन्यावर गेली असता तिला सविताचा खून झाल्याचे निदर्शनास आले. तोपर्यंत संतोषचा भाऊ महेश याने संतोषला पकडून ठेवले होते. त्यानंतर त्याला आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले. महेशच्या फिर्यादीवरुन ३०२ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
पो. नि. हर्षवर्धन गवळी यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण सत्र न्यायालय बीड येथे वर्ग करण्यात आले होते. याची सुनावणी जिल्हा व सत्र न्या. - ४ आर. व्ही. हुद्दार यांच्यासमोर झाली. यावर सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार व सविताची मुलगी प्रीती तसेच इतर साक्षीदारांचे जवाब, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष, तसेच आरोपीकडून जप्त केलेला दगडी पाट्यावरील आढळलेले रक्ताचे डाग तसेच इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील भागवत एस. राख यांनी या प्रकरणात युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरत न्या. हुद्दार यांनी संतोषला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्ट ए.एस.आय. अधिकारी म्हणून हे.कॉ. प्रतापसिंह ठाकूर यांनी मदत केली.