पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:11 AM2019-03-31T00:11:54+5:302019-03-31T00:12:11+5:30
मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने पतीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मुलबाळ होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने पतीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी सुनावला.
केज येथील प्रिया बबन इनकर हिचा विवाह तालुक्यातील वरपगाव येथील भीमराव भगवान बनसोड याच्यासोबत सन २०१२ मध्ये झाला होता. लग्नानंतर दोन वर्षे विवाहितेस चांगले नांदवले. भीमरावला दारू पिण्याचे व्यसन जडल्याने पत्नीस माहेरहून खर्चासाठी पैसे घेऊन ये म्हणून आणि तुला मुलबाळ कसे होत नाही म्हणत पत्नीस त्रास देण्यास सुरुवात केली.
११ जून २०१५ रोजी प्रिया दुपारी जेवण केल्यानंतर पलंगावर झोपली असता पतीने तिचा गळा दाबून खून केला. ही घटना दुपारी घडल्यामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत पती आत्महत्याचा बनाव करण्याची शक्कल लढवत होता. अखेर सायंकाळी ५ वाजता तिच्या माहेरच्या लोकांना प्रियाला हृदयविकाराचा झटका आल्याने ती मयत झाल्याचे सांगितले. माहेरच्या नातेवाईकांनी तात्काळ मुलीच्या घरी पोहोचून मुलीच्या तोंडातून व नाकातून रक्तस्त्राव झाल्याचे दिसताच त्यांचा संशय बळावला.
या घटनेची माहिती नातेवाईकांनी केज पोलिसांना दिल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह केज ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन लाकाळ यांनी तपासाची चक्रे फिरवली. या तपासात आरोपी पतीने सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याचा बनाव केला.
नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, मयत विवाहितेने गळफास घेतला असता तर त्या खोलीमध्ये ना दोरी आढळली, ना स्टूल आढळला. त्यामुळे पोलिसांना हा खून असल्याचे लक्षात आले. खुनाचा कोणताही पुरावा आरोपीने सोडला नसल्याने पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र शवविच्छेदन अहवालात प्रियाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरु केली. परंतु तपासात आरोपी हा आत्महत्येचा बनाव करू लागला होता. शेवटी या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषारोपपत्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालय क्र. १ यांच्या न्यायालयात दाखल केले. न्या. अनिल सुब्रमण्यम यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.
मयताची आई, मामा आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची
मयताची आई उषा बबन ईनकर, मामा व मामी यांचा जवाब नोंदविला व केज येथील ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन केलेले डॉ. ए.जी. दहिफळे यांची साक्ष घेण्यात आली. यात डॉ. दहिफळे यांनी सदरील विवाहितेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे न्यायालयाला सांगितले.
या प्रकारात नेहमी बचावाची भूमिका घेणाऱ्या आरोपी पतीच्या विरोधात कुठलाही पुरावा व प्रत्यक्षदर्शी नसतानाही मयताची आई, मामा व डॉक्टरांच्या साक्षीवरूनच हा खून केल्याचे स्पष्ट झाले.
न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी आरोपी भीमराव बनसोड यास जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयंचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले.
या प्रकरणात आरोपीने कुठलाही पुरावा नसताना पत्नीचा आत्महत्येचा व हृदयविकाराचा केलेल्या बनवाचे बिंग फुटले होते.
पुरावा नसतानाही यात आरोपीला शिक्षा होते का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. याचा तपास तत्कालीन पोनि नानासाहेब लाकाळ यांनी केला होता.