ग्रामस्थांची तहान भागण्यासाठी विकले बायकोचे सोने; ७ महिन्यांपासून भागतेय ५ गावांची तहान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 01:22 PM2024-06-11T13:22:41+5:302024-06-11T13:25:55+5:30
शेतामध्ये डाळिंबाची बाग, बाजरीच्या पिकाचा विचार न करता तरुणाने दोन बोअर केल्या ग्रामस्थांसाठी खुल्या
बीड : दुष्काळाची झळ सोसणाऱ्या बीड जिल्ह्यात माणुसकीचे झरे पाहायला मिळत आहेत. बीड तालुक्यातील जरुड येथील एक अवलियाने चक्क बायकोच्या अंगावरील सोने विकून घेतलेल्या बोअरद्वारे सात महिन्यांपासून पाच गावांची तहान भागवत असून मागचा पुढचा कोणताही विचार न करता अविरत आपला संकल्प पार पाडत आहे.
जरुड येथील राजेश काकडे याच्याकडे असलेल्या तुटपुंजी जमीन आहे. या जमिनीवर तसेच शहरातील एका खासगी ठिकाणी काम करून उदरनिर्वाह भागवतो. मात्र गावातील पाण्याची टंचाई त्याला झोपू देत नव्हती. ही टंचाई दूर करण्याच्या विचारात असतानाच शेतामध्ये डाळिंबाची बाग, बाजरीच्या पिकाचा विचार न करता त्याच्याकडील शेताला पाणी पुरविणाऱ्या बाेअरचे पाणी गावांना वाटण्याचा निर्णय सात महिन्यांपूर्वी राजेशने घेतला. आज जवळपास पाच ते सात गावांपर्यंत त्यांनी घेतलेल्या दोन बोअरचे पाणी पोहोचत आहे. हे पाहून ग्रामपंचायतनेदेखील त्याच्या कार्यात हातभार लावला. गावातील कोणतेही कार्य असेल व समोरच्या व्यक्तीची परिस्थिती नसेल तिथपर्यंत राजेश मोफत पाणी पोहचवित आहे. राजेशचे मोठे बंधू पंजाब रामचंद्र काकडे यांनीदेखील आपल्या छोट्या भावाच्या या कौतुकास्पद कामगिरीत हातभार लावायला सुरुवात केली. माणुसकीच्या या कामात राजेशचे मित्र श्याम काकडे, अशोक काकडे, विठ्ठल जाधव, कल्याण काकडे आदी त्याला सहकार्य करीत आहेत.
परिसरातील गाव, वस्तीचे लोक येतात पाण्यासाठी
सुरुवातील जरुडमध्ये पाणीवाटप सुरू केले. मात्र गावाला एका बोअरचे पाणी पुरत नव्हते. त्यामुळे दुसरा बोअर घेण्याचा प्रस्ताव घरच्यांसमोर मांडला. याला घरच्यांनी विरोध केला. मात्र हा विरोध झुगारून त्याने चक्क पैसे नसताना बायकोच्या अंगावरील सोने विकले. आलेल्या पैशातून एक बोअर घेतला आणि पुन्हा जोमाने पाणीवाटप सुरू केले. जरुडसह शिवणी, भवानवाडी, कुटेवाडी, बाबळखुंटा, गायकवाड वाडा व अन्य छोट्या-मोठ्या वस्तीमधील या ठिकाणी पाण्यासाठी येऊ लागले. हे पाणी गेल्या सात महिन्यापासून या लोकांची तहान भागवत आहे.