'आता शेती कराव की मराव'; ७२० किलो डाळींब विक्रीतून आले केवळ २३३ रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 18:41 IST2019-11-22T18:39:28+5:302019-11-22T18:41:25+5:30
पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली.

'आता शेती कराव की मराव'; ७२० किलो डाळींब विक्रीतून आले केवळ २३३ रुपये
- नितीन कांबळे
कडा : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर बागा बहरल्या आहेत. अतिवृष्टीतही शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागांची निगा राखल्याने फळ चांगली आहेत. मात्र, दर गडगडल्याने ७२० किलो डाळींबाची विक्री करून केवळ २३३ रुपये हाती आल्याने देवळाली येथील शेतकऱ्याने व्यथित मनाने 'शेती कराव की मराव' अशा भावना व्यक्त करत गावाची वाट धरली.
आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची या गावची ओळख तशी पानमळ्याची आहे. पण पाणी नसल्याने पानमळे नामशेष झाली आणि आता फळबागाची मोठ्या प्रमाणावर लागवड असलेले गाव आहे. या गावातील रमेश डोके या सुशिक्षित शेतकऱ्याने तीन दिवसांपूर्वी डाळींब तोडणी केली. यातील ७२० किलो डाळींब ३६ कॅरेटमध्ये घेऊन विक्रीसाठी ते सोलापूरच्या बाजारपेठेत गेले. येथे डाळींब विक्रीतून त्यांना 3933 रुपये मिळाले मात्र यातून 3000 रु गाडीभाडे, मापाडी हमाली 701 असे वजा होऊन केवळ 233 रूपयेच हाती आले. जीवाचे रान करून मोठ्या आशेने जपलेल्या डाळींबाच्या विक्रीतून तुटपुंजी रक्कम आल्याने खाली मान घालत डोळ्यातले पाणी व हुंदके लपवत डोके यांनी घराचा रस्ता धरला. पाणी उपलब्ध नसतानाही शेततळ्याच्या माध्यमातून फळबाग जोपासली. पण फळाला योग्य भाव नसल्याने डोके यांना आर्थिक संकट दिसत आहे. यातूनच त्यांनी आता शेती कराव की मरव अशी व्यथा व्यक्त केली.