अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:35 AM2021-05-27T04:35:03+5:302021-05-27T04:35:03+5:30
बीड : अनुदानित बियाणे वितरणाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला ...
बीड : अनुदानित बियाणे वितरणाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अनुदानित बियाणाच्या खरेदीसाठी चार लाख ३७ हजार ४११ जणांनी अर्ज केले आहेत. या माध्यमातून सोडत करून अनुदानावर बियाणे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे.
योजनेत अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वांधिक आहे. त्यामुळे कोणाची निवड लॉटरीमध्ये होईल याविषयी माहिती मिळू शकत नाही. २६ मे रोजी रात्री लॉटरी निघणार असून, मे महिनाअखेर या अनुदानित बियाणांचे वाटपदेखील सुरू करण्यात येणार आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या त्या तुलनेत असावी, अशी मागणी नागरिकांची आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर एक संदेश येणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मोफत बियाणे १२ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले जाते. दरम्यान, दोन हेक्टरच्या मर्यादेतच शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळणार आहेत. लॉटरी जाहीर झाल्यानंतर याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाते. विशेष म्हणजे कोरोना संसर्ग वाढल्यामुळे शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर खर व बियाणे पुरविण्याची तयारी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून चार लाख ३७ हजार अर्ज
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली होती.
सोमवारी हा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेमध्ये प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. त्यासोबत पीक प्रात्यक्षिक बियाणे उपलब्ध होणार आहे. अंतरपीक बियाणे आणि मिनी कीट यासाठीदेखील शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
कोणत्या योजनेसाठी किती अर्ज
बियाणे -४,३७,४११
यांत्रिकीकरण -६७०९४९
उद्यान विद्या - ४५४३१२
सूक्ष्मसिंचन - ५०८१६५
शेतकऱ्यांना येतील संदेश
बियाणांसाठी लॉटली लागल्यानंतर सहभागी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एक संदेश येईल. त्यानंतर कृषी विभागातील अधिकारी संबंधित शेतकऱ्यांना खरेदीसाठी परमिट देतील. ते परमिट घेऊन शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडे जायचे आहे.
सर्वाधिक मागणी यांत्रिकीकरणाची
शेतातील विविध योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर सर्वाधिक मागणी यांत्रिकीकरणासाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये जवळपास सहा लाख ७० हजार शेतकरी सभासदांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय पाॅवर टिलर, नांगरण, बैलचलित यंत्र याव्यतिरिक्त अन्य योजनेच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात
ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय किचकट आहे. थम्ब मशीन शेतकऱ्यांचा थम्ब स्वीकारत नाही. त्यामुळे ओटीपी येण्यासाठी वेळ लागतो. काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातावरचे ठसे बदलतात याची जाणीव शासनाला नाही. त्यामुळे अनेेकांची नोंद होऊ शकली नाही. - हनुमंत डंबरे, शेतकरी
गतवर्षी संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांसाठी हलाखीचे राहिलेले आहे. अवकाळी पाऊस, वादळे यांचा तडाखा बसल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट अनुदानित बियाण्यांचे वाटप करणे अपेक्षित होते.
-अरुण खंडागळे, शेतकरी
एसएमएस आला तर...
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांची निवड होणार आहे. लॉटरी पद्धतीने निवड होण्याच्या या प्रक्रियेत झालेल्या निर्णयासंदर्भात शेतकऱ्यांना एसएमएस मिळेल. त्यानंतर खरेदीसाठी परमिट द्यायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल. एसएमएस मिळाला नाही तर अनुदानित बियाण्यांसाठी लॉटरी लागली नाही असे समजावे.