यंदा तरी आमच्या कष्टाचे चीज होईल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:13+5:302021-09-07T04:40:13+5:30
कडा : गेल्या वीस वर्षांपासून घरच्याघरीच गणेशमूर्ती बनवून त्यावर आम्ही उपजीविका करीत आहोत. परंतु मागील वर्षापासून कोरोनाने ...
कडा : गेल्या वीस वर्षांपासून घरच्याघरीच गणेशमूर्ती बनवून त्यावर आम्ही उपजीविका करीत आहोत. परंतु मागील वर्षापासून कोरोनाने मोठे संकट निर्माण केल्याने मूर्तिकाराचे जगणे कठीण बनले आहे. यंदाही दीड हजार मूर्ती तीन महिन्यांच्या मेहनतीतून तयार आहेत. पण कोरोनाचे विघ्न कायम असल्याने यंदा तरी आमच्या कष्टाचे चीज होईल का? असा सवाल पिंपळा येथील मूर्तिकार विष्णू दिवटे यांनी उपस्थित केला आहे.
पिंपळा येथील कुंभार समाजातील विष्णू महाराज दिवटे हे परिवारासह गणेश मूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. यंदा तरी आर्थिक चाक फिरण्याच्या आशेवर त्यांनी तीन महिने आधीपासूनच मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बाप्पाचा उत्सव देखील कडक निर्बंधात साजरा झाला. बनवलेल्या गणेश मूर्ती विकल्या न गेल्यामुळे कर्ज वाढत गेले. यंदा तरी बाप्पाचा उत्सव आर्थिक विघ्ने दूर करेल या आशेवर दिवटे यांनी मूर्ती तयार केल्या आहेत. बीड, सोलापूर, अहमदनगर, आष्टी, पाथर्डी, शेवगाव परिसरातून दिवटे यांच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती आहे.
...
सरकारनेही मदत करावी
शंभर ते दोन हजार रुपये किमतीच्या गणेश मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी ५० हजार उत्पन्न मिळाले. यंदा ते एक लाख मिळेल अशी आशा आहे. सरकारनेही मूर्तिकारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी विष्णू दिवटे यांनी केली आहे.