लेटलतीफ भानावर येतील काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:28 PM2020-03-02T23:28:58+5:302020-03-02T23:30:18+5:30
बीड : प्रशासनाचा पहिला दिवस परीक्षेच्या बंदोबस्तात : दुपारी ३ पर्यंत जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट शासनाने पाच दिवसांचा आठवडा ...
बीड : प्रशासनाचा पहिला दिवस परीक्षेच्या बंदोबस्तात : दुपारी ३ पर्यंत जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट
शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यालयीन वेळ आहे. सलग दोन सुट्यांनंतर सोमवारी जनतेसाठी असलेल्या शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. बीड, केज, परळी, धारूर, शिरुर कासार, अंबाजोगाई आणि गेवराई येथे केलेल्या पाहणीमध्ये बहुतांश अधिकारी, कर्मचारी वेळेवर तर काही प्रमाणात लेटलतीफ दिसून आले. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्यांची फारशी वर्दळ नव्हती. अकरा वाजेपर्यंत कामे घेऊन येणाºयांची संख्या मात्र कमी होती. कुठे कामकाज करताना तर काही खुर्च्यांवर कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त होते. एक हजार पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी परीक्षा बंदोबस्तावर होते.
बीड : सोमवारी सकाळी ९.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास ६० टक्के उपस्थिती होती. तर तहसील कार्यालयात मात्र, खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थपना विभागात १० पैकी १० कर्मचारी उपस्थित होते. दुस-या आस्थापनेत १६ पैकी ७ उपस्थित होते. दोन्ही तहसीलदारांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. निवडणूक विभागात फक्त १ कर्मचारी उपस्थित होता. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनातही एकमेव कर्मचारी होता. गौणखनिज, लेखा विभाग, भूसंपादन व सैनिकी विभागातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. काही ठिकाणी कर्मचारी वेळेत येऊन देखील बाहेर गप्पा मारताना दिसले. बीड उपविभागीय अधिकारी कार्यालयात १० पैकी ५ कर्मचारी नव्हते. तर उपविभागीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणून जाणार असल्याची माहिती मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या दालनातील सर्व शिपाई संवर्गातील कर्मचारी व २ लिपीक वेळेवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी औरंगाबाद येथे बैठक असल्यामुळे गैरहजर असल्याचे संबंधित कर्मचा-याने सांगितले.
बीड पालिकेत केवळ १९ च वेळेवर
बीड : बीड नगर पालिकेतील नगर रचना, लेखा, विद्यूत, स्वच्छता विभागाचे कुलूपच १० वाजेपर्यंत उघडले नव्हते. तर १०० पैकी केवळ १९ कर्मचारी ९.४५ वाजता कार्यालयात हजर झाले होते. मुख्याधिकारी स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी शहरात फिरत असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी सर्वांनी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात येणे आवश्यक होते. परंतु बीड नगर पालिकेत नेहमीप्रमाणेच परिस्थिती दिसून आली. १०० पैकी केवळ १९ कर्मचारीच वेळेवर येऊन त्यांनी हजेरी पुस्तीकेवर स्वाक्षरी केली. यात कार्यालयीन अधीक्षक युवराज कदम, पाणी पुरवठा अभियंता राहुल टाळके, भगवान कदम, सुनिल काळकुटे, अमोल शिंदे, राम शिंदे, आर.एस.येरगोळे, जी.आर. लव्हळकर, आर.सी.मुलानी, आर.डी.बरकसे, सुमन ससाणे, संजय चांदणे, एस.पी.आंधळे, के.बी.भालशंकर, लालबीहाशम, मारूती सुतार, अ.वाहेद वाहब, शेख इरफान, संतोष कागदे यांचा समावेश होता.
मुख्यधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे हे १०.५६ पर्यंत ते कार्यालयात आले नव्हते. माहिती घेतली असता ते स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यासाठी शहरात फिरत असल्याचे सांगण्यात आले.
परळीत उपजिल्हाधिकाºयांच्या कक्षास कुलूप
परळी : येथील उपजिल्हाधिकारी व तहसील कार्यलयात सोमवारी सकाळी ९.४५ ते १०.१५ वाजेपर्यंत तहसीलदार व उपजिल्हाधिकारी हे प्रमुख अधिकारी कार्यलयात आलेच नव्हते. तसेच दोन नायब तहसीलदार ही परीक्षा केंद्रावर गेले होते. तहसील कार्यालयात ७ कर्मचारी, तर उपजिल्हा कार्यालयात ३ कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले. उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षास कुलूप लावलेले होते व तहसीलदारांच्या कक्षाचा दरवाजा लावलेला होता.
तहसील कार्यालयात १५ पैकी २ महिला कर्मचारी व इतर ५ पुरुष कर्मचारी ९.४५ वाजेच्या सुमारास हजर होते. सकाळी १०.१५ च्या दरम्यान मालेवाडी येथून विशाल बदने तहसील कार्यलयात व उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास आले होते परंतु अधिकाºयांची भेट झाली नाही. १०.१८ वाजता उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी परीक्षाच्या कामात आहे. दुपारी २.१५ नंतर कार्यालयात भेट होईल. तहसीलदार विपिन पाटील यांनी बीड येथे बैठकीस आल्याचे सांगितले.
काही कर्मचारी परीक्षेसाठी सकाळी ग्रामीण भागात रवाना झाले होते. दोन नायब तहसीलदार हे बारावी परीक्षेसाठी, तर एक नायब तहसीलदार रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
सकाळी १०.१५ पूर्वी उपजिल्हाधिकारी कक्षाचे कुलुप बंद होते. यावेळी दोनच कर्मचारी होते. एक कर्मचारी १०.१५ च्या दरम्यान आला. दुय्यम निबंधक कार्यालयात उपनिबंधक प्रशांत दहिवाळ, इतर ४ कर्मचारी सकाळी १० च्या आत उपस्थित होते. पंचायत समिती व नगर परिषद कार्यालयात बहुतांश कर्मचारी वेळेवर उपस्थित होते.