आता बोर्डाला काही सांगणार नाही, थेट गुन्हे दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:12 PM2020-02-27T23:12:53+5:302020-02-27T23:13:41+5:30
भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
बीड : भयमुक्त शांततेत,व ताणवमुक्त वातावरणात विद्यार्थी परीक्षा देतील याबाबत जिल्हाधिकारी व मी गंभीर आहोत. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार निदर्शनास आल्यास बोर्डाला काही सांगणार नाही, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता थेट गुन्हे दाखल करणार अशी तंबी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.
येत्या ३ मार्चपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता समिती व शिक्षण विभागाच्या वतीने गुरूवारी १५६ केंद्र संचालकांची महत्वाची बैठक येथील स्काऊट भवनात झाली. त्यावेळी सीईओ कुंभार बोलत होते.
यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी (मा.) नजमा सुलताना, उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, गटशिक्षणाधिकारी मिनहाज पटेल, विस्तार अधिकारी नानाभाऊ हजारे, तुकाराम पवार आणि शिक्षण विभागाचे संबंधित कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
रेखावार- कुंभार पॅटर्न
परीक्षा केंद्रावर वर्ग-१ चे अधिकारी, भरारी पथक,बैठे पथक,पोलीस पथक, महसूल पथक तसेच महत्वाच्या पेपरला जिल्हास्तरावरून वर्ग-१ व २ च्या १५६ अधिकाऱ्यांचे विशेष पथक नियुक्त केले आहेत. परीक्षा केंद्र परिसरात पालकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. केंद्र संचालक व पर्यवेक्षकांनी ठरवले तर परीक्षा कॉपीमुक्त होऊ शकतात. वर्षानुवर्षे जिल्ह्यातील परीक्षेची चुकीची पद्धत मोडीत काढली जाणार आहे. परीक्षा केंद्रांना मी व जिल्हाधिकारी भेटी देणार असल्याचे सांगत सीईओ अजित कुंभार यांनी ह्यरेखावार- कुंभारह्ण पॅटर्न स्पष्ट केला.
प्रामाणिक विद्यार्थ्याला न्याय मिळावा
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात परीक्षा होतील असे सांगून या परिक्षेकडे केंद्र संचालकांनी व त्यांच्या अधिनस्थ पर्यवेक्षकांनी औपचारिकपणे न पाहता गंभीरपणे पाहावे. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.केंद्र संचालक हे परीक्षाकामी सक्षम अधिकारी आहेत. गरज पडल्यास जादा पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी, अशी सुचना कुंभार यांनी केली.
केंद्रावर सर्व भौतिकसुविधा द्या, गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा,एका डेस्कवर एकच विद्यार्थी असावा, परिक्षेसंबंधी कर्मचाऱ्यांना ओळखपत्र द्यावे, केंद्रसंचालका व्यतिरिक्त कोणाकडे मोबाईल नसावा. डमी विद्यार्थी असणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सीईओंनी केली.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव, गौतम चोपडे, शेख जमीर, रवींद्र महामुनी, राऊत, धनंजय शिंदे, धनंजय बोंदरडे, अर्जुन गुंड आदी उपस्थित होते.