सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 11:19 IST2025-04-17T11:04:05+5:302025-04-17T11:19:25+5:30

राजकीय संघर्षानंतर आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते आज सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Will Suresh Dhas Dhananjay Munde be seen together today in shirur kasar program | सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष

सुरेश धस-धनंजय मुंडे आज एकत्र दिसणार?; शिरूर कासारमधील सोहळ्याकडे राज्याचं लक्ष

Beed Politics: केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप नेते आणि आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला. देशमुख हत्या प्रकरणासह बीड जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी घटनांवरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक घणाघाती आरोप केले. आमदार धस यांनी केलेले आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात आढळलेला निकटवर्तीयांचा सहभाग यामुळे मुंडे यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. या राजकीय संघर्षानंतर आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते आज सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसण्याची  शक्यता वर्तवली जात आहे.

भगवानगडाच्या नारळी सप्ताहाचं आयोजन शिरूर कासार इथं करण्यात आलं होतं. या सप्ताहाचा आज सांगता सोहळा होणार असून धनंजय मुंडे हे सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आष्टी-शिरूर-पाटोदा या मतदारसंघाचे आमदार असलेले सुरेश धस हेदेखील या सोहळ्याला हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र दिसू शकतात.

राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार

मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे हे काहीसे अज्ञातवासात गेल्याचे पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावेळीही मुंडे यांनी कार्यक्रमांना हजर राहणं टाळलं होतं. मात्र आपण आज नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला हजर राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. "आज दुपारी १२ वाजता पिंपळनेर ता. शिरूर कासार येथे भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात आशीर्वाद घ्यायला येत आहे," असं धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितलं आहे.

दरम्यान, सरपंच हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची दोनदा भेट घेतल्याने वादंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज मुंडे यांच्यासोबत सुरेश धस हे एकत्रित या सोहळ्याला उपस्थित राहतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Will Suresh Dhas Dhananjay Munde be seen together today in shirur kasar program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.