बीड पोलीस दलात बदल्यांचे वारे, वाळू पट्ट्यासाठी इच्छुकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:28+5:302021-07-09T04:22:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे रखडलेल्या पोलीस दलातील बदल्यांना आता सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच ठाणेप्रमुख होण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे रखडलेल्या पोलीस दलातील बदल्यांना आता सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच ठाणेप्रमुख होण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, सत्तेत सहभागी नेते आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना चांगले ठाणे मिळावे यासाठी त्यांचे राजकीय वजन वापरत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अधिकारीही त्यांच्या सोयीप्रमाणे सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी बदलीसाठी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याचीदेखील माहिती असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय नेते व त्यांच्या चेल्यांचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेकांचा ठाणेप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आलेला आहे. त्यामुळे ठाणेप्रमुख पदासाठी अधिकाऱ्यांकडून इच्छादेखील व्यक्त केली आहे. यामध्ये सर्वस्वी निर्णय हे वरिष्ठ घेणार आहेत. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होणार असून, चोहोबाजूने विचार करून ठाणेप्रमुख पद बहाल केले जाणार असल्याचीदेखील सूत्रांची माहिती आहे.
....
काही दिवसांत होणार निर्णय
पुढील काही दिवसांत ठाणेप्रमुख पदाच्या रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चांगले ठाणे मिळावे यासाठी अनुभवी व काही राजकारण्यांशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी राजकीय वजन वापरण्याच्या हेतूने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत, तर बदलीची चर्चा सद्य:परिस्थितीत पोलीस दलात चवीने केली जात आहे.
...
सर्वच ठाण्यांना दिली जातेय पसंती
पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणेप्रमुखांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. ग्रामीण भागातील ठाणे असल्यामुळे व वाळू पट्टा असल्याने त्याठिकाणी असलेली गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण यासाठी इच्छुक आहेत.
पेठ बीड : पोलीस ठाण्याचे प्रमुख विश्वास पाटील हे आहेत. मात्र, त्यांच्या कार्यकाळात गुटखा व इतर अवैध धंदे मोठ्या जोमात सुरू आहेत, तसेच वेळोवेळी वरिष्ठांकडून सांगूनदेखील कार्यपद्धती न बदलल्यामुळे त्यांच्यावर कायम वरिष्ठाची नाराजी राहिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होणार असून, त्याठिकाणी जाण्यासाठीदेखील काहीजण इच्छुक आहेत.
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. याठिकाणी असलेले ठाणेप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या काळात या ठाणे हद्दीत गुन्हेगारी कमी होण्यास मदत झाली आहे, तसेच त्यांनी विशेष उपक्रम देखील या परिसरात राबवले होते. त्याठिकाणी देखील पसंती आहे.
चकलंबा : चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील वाळू प्रकरणांमुळे अनेकवेळा चर्चेत असते. याठिकाणी जाण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संवर्गातील अधिकारी इच्छुक असून, त्यासाठी विशेष गेवराईतील नेत्यांचा पाठिंबा घेतला जात आहे.
परळी शहर : पालकमंत्र्यांचे गाव असलेल्या परळी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारीदेखील कार्यकाळ संपल्यामुळे बदलण्यात येणार आहेत. याठिकाणी पालकमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी येण्यासाठी शक्यता वर्तवली जात आहे.