बीड जिल्हा परिषदेच्या सभेत वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:23 AM2018-09-25T01:23:09+5:302018-09-25T01:23:46+5:30
सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बिंदू नामावली रोस्टरचे पालन न करात झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या, गावांतील चायना मेड पथदिवे, दुष्काळी स्थिीती, शाळांचा कायापालट निधी, पशुसंवर्धन विभागातील गुजरात मेड नॉट फॉर सेलच्या सुया आदी विषयांवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. तर स्वच्छतेचा ढोल बडवला जात असल्याने कुठे आहे स्वच्छता? असा सवाल जि. प. सदस्यांनी केला.
सोमवारी दुपारी जिल्हा नियोजन सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. आंतर जिल्हा बदलीने आलेल्या व अतिरिक्त शिक्षकांच्या नियुक्त्या बिंदू नामावली रोष्टरचे पालन न करता केल्याचा मुद्दा सदस्य अशोक लोढा यांनी मांडला. इतर सदस्यांनीही मते मांडली. काहींनी जिल्हयात आले तर राहू द्यावे तर काहींनी न्यायलयाच्या निर्देश पालनाबाबत मत मांडले. निकालाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त्यांबाबत व अतिरिक्त शिक्षकांवर कार्यवाही करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमाल येडगे यांनी सांगितले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. परंतू प्रत्यक्षात स्वच्छता कुठे आहे, अभियान राबवताना लोकप्रतिनिधींना डावलणे, प्रचारावर केलेल्या विविध स्वरुपाच्या खर्चाबाबत आक्षेप नोंदविले. चंद्रकांत शेजुळ, राजेसाहेब देशमुख, डॉ. योगिनी थोरात, अशोक लोढा, बजरंग सोनवणे यांनी चर्चेत भाग घेतला. नेमके काम काय झाले अशी विचारणा सदस्यांनी केली. यावर येत्या ३ आॅक्टोबर रोजी पदाधिकारी, सदस्य, सर्व बीडीओंची बैठक घेतली जाणार असल्याचे सभेत सांगण्यात आले.