प्रियकराच्या मदतीने पतीचाच काटा काढला, मृतदेहावरुन उलगडलं कटकारस्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2022 05:36 PM2022-05-01T17:36:32+5:302022-05-01T17:37:11+5:30
विठ्ठल माणिक धायगुडे (३५,रा.औरंगपूर ता.केज) असे मयताचे नाव आहे. सुमेधा विठ्ठल धायगुडे (३५) व रामदास किसन शितळकर (२२, दोघे रा.औरंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत
बीड/केज : पतीच्या आतेभावाशी सुरू असलेल्या प्रेमप्रकरणात पती अडथळा ठरू लागला. त्यामुळे पत्नीने शांत डोक्याने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अर्धवट जळाल्याने भंडाफोड झाला. तब्बल २३ दिवसांनंतर कोल्ड ब्लडेड मर्डरच्या थरारपटाचा उलगडा झाला. तालुक्यातील लाडेवडगाव येथे अर्धवट जळालेले मृतदेह प्रकरणात २७ एप्रिल रोजी धक्कादायक खुलासा झाल्याने खळबळ उडाली. पत्नीसह प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
विठ्ठल माणिक धायगुडे (३५,रा.औरंगपूर ता.केज) असे मयताचे नाव आहे. सुमेधा विठ्ठल धायगुडे (३५) व रामदास किसन शितळकर (२२, दोघे रा.औरंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत. सुमेधाला दोन अपत्ये असून, मुलीचा विवाह झालेला आहे तर मुलगा नववी वर्गात शिकतो. रामदास हा अविवाहित आहे.
लाडेवडगाव शिवारात विठ्ठल मांडे यांच्या शेतात विठ्ठल धायगुडे यांचा ८० टक्के जळालेला मृतदेह ज्वारीच्या कडब्यात ३ एप्रिल २०२२ रोजी आढळून आला होता. मृताची ओळख, लिंग पटविण्यासह त्याचे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. युसूफवडगाव ठाण्यात सहायक निरीक्षक डॉ.संदीप दहीफळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, युसूफवडगाव पोलिसांसह सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनीही समांतर तपास सुरू केला. दोन्ही आरोपींना २७ रोजी अटक करून २८ रोजी केज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तांत्रिक तपासावरून उलगडा
घटनास्थळ परिसरातील मोबाइल कॉलचे पोलिसांनी विश्लेषण केले. यात मयत विठ्ठल धायगुडे यांच्या मोबाइलवरून २ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपी रामदास शितळकरला कॉल केल्याचे उघड झाले अन् पोलिसांचा संशय बळावला. सुमेधाने पती विठ्ठल यास शेतात झोपण्यासाठी नेेले. त्यास झोप लागल्यावर प्रियकराला बोलावून घेतले. कुऱ्हाडीने घाव घालून विठ्ठलला संपविले. त्यानंतर मृतदेह पोत्यात घालून जाळण्याचा प्रयत्न केला. २७ रोजी सुमेधा ही पती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी केज ठाण्यात आली.
दोन वर्षांपासून जुळले सूत
रामदास शितळकर हा सुमेधा धायगुडे हिचा पती विठ्ठल याचा आतेभाऊ आहे. एकाच गावात रहायला असल्याने व नातेवाईक असल्याने दोन्ही कुटुंबाचे सतत एकमेकांकडे येणे- जाणे असायचे. दोन वर्षांपासून रामदास व सुमेधा या दोघांचे सूत जुळले. याची कुणकुण विठ्ठल धायगुडे यास लागल्याने पती- पत्नीत खटके उडत.