युट्युबने केली कमाल, दुष्काळी बीडमध्ये बहरली सफरचंदाची बाग; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:42 PM2022-07-19T12:42:30+5:302022-07-19T12:43:22+5:30

माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली असून या झाडांना चांगली फळे देखील आली आहेत.

with the help of YouTube Apple Orchard Blooms in Drought Beed; The farmer Suresh Sajagane's experiment was successful in Majalgaon | युट्युबने केली कमाल, दुष्काळी बीडमध्ये बहरली सफरचंदाची बाग; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

युट्युबने केली कमाल, दुष्काळी बीडमध्ये बहरली सफरचंदाची बाग; शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

Next

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव (जि.बीड) :
श्रीमंतांपासून गरिबांपर्यत खाल्ले जाणारे सफरचंद हे केवळ थंड हवेच्या ठिकाणीच येत असे. यामुळे महाराष्ट्रात कोणीच सफरचंदाच्या बागेकडे वळत नव्हते. परंतु आता विशिष्ट तापमानात येणाऱ्या सफरचंदाच्या बागा महाराष्ट्रातही फुलू लागल्या आहेत. याला दुष्काळी बीड जिल्हाही मागे राहिलेला नाही. माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने दीड एकरात सफरचंदाची बाग फुलविली असून या झाडांना चांगली फळे देखील आली आहेत.

माजलगाव तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील शेतकरी सुरेश सीताराम सजगणे व बाळासाहेब सीताराम सजगणे या दोन भावात मिळून ४० एकर शेती आहे. यातील सुरेश सजगणे यांचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले असताना ते आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पूर्वी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, कापूस अशी पिके घेतली जात. त्यानंतर शेतात माजलगाव धरणावरून पाईपलाईन करून व शेतात बोअरवेल घेत उसाची शेती केली.

कोरोनाकाळात निवांत वेळ असल्याने मोबाईल हे करमणुकीचे साधन बनले होते. यूट्यूबवर सुरेश सजगणे हे वेगवेगळी फळ शेती व इतर पिकांची माहिती पाहत बसत असत. मे २०२० मध्ये त्यांनी सफरचंदाची बाग पाहिली. त्यामुळे त्यांना आपण सफरचंदाची फळबाग करून पाहावी असे वाटले. त्यानंतर हरिमन शर्मा (दिलासपूर, हिमाचल प्रदेश) यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. सजगणे यांनी आपल्याकडील जमिनीचा प्रकार, तापमान, हवामानासह भौगोलिक माहिती शर्मा यांना दिली. त्यानंतर शर्मा यांनी त्यांच्या शेतात एच.आर.एम.एन. या जातीची सफरचंदाची झाडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात असे सांगितले.

सजगणे यांनी मोठ्या धाडसाने सफरचंदाची ६०० रोपे ऑनलाईन मागवली. यापैकी त्यांनी ४०० रोपे आपल्या दीड एकर शेतात १२ बाय १५ अंतरावर डिसेंबर २०२० मध्ये लावली. बाकीची २०० रोपे त्यांनी मामाला दिली. सफरचंदाची लागवड केल्यानंतर अनेकांनी आम्हाला नावही ठेवले होते. परंतु आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. आता परजिल्ह्यातून शेतकरी बाग पाहण्यासाठी येत आहेत. सफरचंदाच्या सर्व झाडांना ड्रीप करून चार-पाच दिवसांनी पाणी दिले तरी चालते. त्याचबरोबर फवारणी व खताचा खर्च जास्त नाही. सफरचंदाच्या झाडाला जानेवारी महिन्यात फुले येतात. त्यानंतर एक ते दीड महिन्यांनी फळे लागायला सुरुवात होते. तर जून, जुलैमध्ये फळ तयार होते, अशी माहिती शर्मा यांनी आम्हाला दिली होती. यानुसार ही झाडे आम्ही जोपासली आहेत. सफरचंदाच्या शेतात मागील दीड वर्षात टरबूज, मिरची व झेंडू अशी तीन पिके घेऊन जवळपास सहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले. त्यात सर्व खर्च वजा जाता चार लाख रुपये उरले, असे सुरेश सजगणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी केवळ उसाच्या पाठीमागे न लागता वेगवेगळ्या फळबागा लावण्यावर भर द्यावा. ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरच पडेल. सफरचंदाच्या बागेत आम्ही दीड वर्षातील आंतरपीक घेऊन चांगले उत्पन्न मिळवले आहे.
- सुरेश सजगणे, सफरचंद उत्पादक शेतकरी.

Web Title: with the help of YouTube Apple Orchard Blooms in Drought Beed; The farmer Suresh Sajagane's experiment was successful in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.