पतीची साथ आणि सासू-सासऱ्यांचा खंबीर पाठिंबा, आरती कुचेकर झाली पोलिस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 02:20 PM2024-08-05T14:20:16+5:302024-08-05T14:21:21+5:30
विशेष म्हणजे, आरतीने संसाराची जबाबदारी सांभाळत केले स्वप्न पूर्ण
- धम्मपाल डावरे
चिंचाळा (बीड) : जिद्द उराशी बाळगून मेहनत केल्यावर यश हे नक्की मिळतेच, आरती साेमनाथ कुचेकर हिच्या बाबतीतही असे काही झाले. पोलिस होण्याचं स्वप्न उराशी बाळगतानाच संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत मुंबई व ठाणे पोलिस दलात दोनवेळा वेटिंगवर राहिलेल्या आरतीची अखेर बीड पोलिस दलात निवड झाली.
बीड येथील मुरलीधर झाडे यांच्या सामान्य कुटुंबातील आरतीने पोलिस भरतीची तयारी सुरू करत खासगी अकॅडमी जाॅईन केली. पोलिस भरतीचे धडे गिरविताना तिची ओळख याच अकॅडमीतील सोमनाथशी झाली. मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात व लग्नात झाले. आरती आणि सोमनाथ हे तिगाव येथे राहू लागले. गावातच राहून दोघेही पोलिस भरतीची तयारी सुरू केली. पुढच्या भरतीत दोघेही भरतीसाठी उभे राहिले आणि दोघांनाही अपयश आले. त्यानंतर पुन्हा अकॅडमी जॉईन करण्यासाठी दोघे बीड येथे आले. संसाराची जबाबदारी असल्याने सोमनाथ ड्रायव्हिंगचे काम करू लागला तर आरतीनेही पोलिस भरतीची तयारी सुरू केली. त्यानंतर दोन वेळा मुंबई आणि ठाण्यात अपयश आल्यानंतरही न खचता पोलिस भरतीची तयारी सुरूच ठेवली. नुकत्याच झालेल्या भरतीमध्ये आरतीची बीड पोलिस दलात निवड झाली.
दोन वेळेस हुलकावणी
मुंबई आणि ठाणे येथील पोलिस भरतीमध्ये दोन वेळा आरतीने वेटिंग लिस्टमध्ये स्थान मिळविले; परंतु नशिबाने हुलकावणी दिली. त्यामुळे तिची निवड होऊ शकली नाही; परंतु यावर्षी आरती ही बीड पोलिस दलात भरतीसाठी उभी राहिली आणि तिची पोलिस शिपाई पदावर निवड झाली.
आरतीला पतीची साथ
लग्न झाल्यावर स्त्रिया चूल आणि मूल यात अडकून राहतात; परंतु पत्नीला पोलिस बनविण्यासाठी सोमनाथने घेतलेली मेहनत आरतीच्या यशाचे गुपित आहे. तिच्या सासू-सासऱ्यांचेही आरतीला पोलिस व्हावे म्हणून पाठबळ होते.
तिगावची सून झाली पहिली महिला पोलिस
वडवणी तालुक्यातील तिगावची सून आरतीची निवड झाल्याबद्दल गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांच्या वतीने आणि सरपंच अर्चना राज पाटील यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
कुटुंबीयांचा मोलाचा वाटा
दोन वेळेस प्रतीक्षायादीत माझे नाव होते; परंतु निवड झाली नाही. त्यामुळे मी न खचता आणखी जोमाने तयारी केली. या वेळेस मला यश मिळाले. माझ्या यशात माझे सासू-सासरे, मोठे दीर, माझे पती व कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज पोलिस झाले.
- आरती सोमनाथ कुचेकर, नवनियुक्त पोलिस शिपाई, बीड पोलिस दल.