बनावट एटीएम कार्डद्वारे शिक्षकाच्या खात्यातील ८० हजारांच्या रकमेवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:36+5:302021-01-02T04:27:36+5:30
अभिमान भीमराव पायाळ (रा. पंचशीलनगर, बीड) हे बीड तालुक्यातील कुर्ला येथील शाळेवर शिक्षक आहेत. त्यांचे बीडच्या एसबीआय बँकेत पगारी ...
अभिमान भीमराव पायाळ (रा. पंचशीलनगर, बीड) हे बीड तालुक्यातील कुर्ला येथील शाळेवर शिक्षक आहेत. त्यांचे बीडच्या एसबीआय बँकेत पगारी खाते आहे. मागील शुक्रवारी (दि.२५) सकाळी त्यांनी एटीएम कार्डद्वारे खात्यातून ११ हजार रुपये काढले. त्यानंतर २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान वेळोवेळी एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून एकूण ८० हजारांची रक्कम काढून घेतल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता मुंबईतील दादर आणि चेंबूर येथील एटीएममधून सदरील रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. परंतु, एटीएम कार्ड बीडमध्ये स्वतःजवळ असताना मुंबईच्या एटीएममधून रक्कम काढल्याने भामट्यांनी बनावट एटीएम कार्ड तयार करून सदरील व्यवहार झाल्याची त्यांना खात्री पटली. याप्रकरणी अभिमान पायाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे हे करत आहेत.