चार दिवसातच झाली सहायक पोलीस निरीक्षकाची बदली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:06 AM2020-02-06T00:06:38+5:302020-02-06T00:07:13+5:30
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर उस्मानाबाद येथे बदलून गेलेले तसेच चार दिवसांपूर्वी पुन्हा बीड येथे आलेले सपोनि मुंडे यांची अवघ्या चार दिवसात पुन्हा उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे.
बीड : पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार याची बदली होणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत होती. त्यांच्या जागेवर उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक ए. राजा हे येणार असे बोलले जात होते. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर पूर्वी बीड जिल्ह्यात कर्तव्यावर असणारे व नंतर उस्मानाबाद येथे बदलून गेलेले तसेच चार दिवसांपूर्वी पुन्हा बीड येथे आलेले सपोनि मुंडे यांची अवघ्या चार दिवसात पुन्हा उस्मानाबादला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मुंडे यांनी बीड येथे आल्यानंतर नेमके काय केले की त्यामुळे त्यांची परत बदली करण्यात आली, या चर्चेला उधाण आले आहे.
उस्मानाबाद येथून चार दिवसांपूर्वी बदली होऊन सपोनि गणेश मुंडे हे बीड येथे आले होते. दरम्यान ते बीड येथे आल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली होणार असून, त्यांच्या जागेवर ए. राजा येणार असल्याची चार्चा दबक्या आवाजात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वर्तुळात सुरु झाली होती. मात्र, चार दिवसांतच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढून पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यात बदली केली आहे. दरम्यान त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. मुंडे हे यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात कार्यरत होते आणि त्याकाळात त्यांची कारकीर्द काही प्रमाणात वादग्रस्त देखील ठरली होती. त्यांना ठाणेप्रमुख पदावरून मुख्यालयावर नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान मुंडे यांची पुन्हा बदली झाल्यामुळे उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची नियुक्ती बीड येथे होण्याची शक्यता नाही.
गणेश मुंडे हे ए.राजा यांचे निकटवर्तीय
मागच्या काही दिवसांपासून बीडच्या पोलीस अधीक्षकपदी ए. राजा येणार असल्याच्या चर्चा पोलीस दलात सुरु होती. ए. राजा उस्मानाबादला असताना त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि त्यांचे निकटवर्तीय असल्याची सूत्रांची माहिती आहे. याच दरम्यान सपोनि मुंडे यांची बदली बीडला झाल्याने ए. राजा हे बीडला येणार असल्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, ए.राजा यांची बीडला बदली व्हावी याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींनी देखील राजा यांच्या नावाला विरोध केला होता.
हर्ष पोद्दार यांच्या बदलीला नागरिकांमधून विरोध
पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बीड पोलीस अधीक्षकपदी नियुक्त झाल्यापासून त्यांनी बीड पोलीस दलात अमुलाग्र बदल केले आहेत. तसेच पोलीस दलातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी विविध प्रयोग त्यांनी राबवले, गुन्हे उघडकीस यावेत, गुन्हेगाराविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन त्याला शिक्षा कशी होईल या दृष्टीने कृतिशील कार्यक्रम राबवला व संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. निवडणूका, अयोध्या येथील जागेचा निकाल व इतर काही कठीण प्रसंगात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्य नियोजन केले. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष अधिकाºयाची बीड जिल्ह्याला आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्याचा उद्देश नेमका कोणाचा आहे याविषयी नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.