चार वर्षांतच आटले का बहीण-भावातील प्रेम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:08 AM2018-10-24T00:08:35+5:302018-10-24T00:09:20+5:30

राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे.

Within four years, my sister-brother's love ...! | चार वर्षांतच आटले का बहीण-भावातील प्रेम...!

चार वर्षांतच आटले का बहीण-भावातील प्रेम...!

Next

- सतीश जोशी

राजकारणात सत्तेची लालसा इतकी असते की, त्यासाठी सोयीप्रमाणे नाते-गोते आणले जाते किंवा झिडकारले जाते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील या गोष्टीला अपवाद नाहीत की काय, असे वाटू लागले आहे. भारतीय संस्कृतीत नात्यांना प्रतिष्ठा आहे आणि काही अपवाद सोडले तर ती आजही जपली जाते. केंद्रीय ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात परतताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अख्खा देश हळहळला. कष्टकरी, वंचितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गोपीनाथरावांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राला  धक्कादायक होते.

या आघाताने मुंडे कुटूंब तर संपूर्णत: कोसळले होते. मुंडे कुटुंबियांना धीर देण्यासाठी सर्व राजकीय पक्षासह अख्खा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा टाकला होता. आपल्या बाबांचे कार्य पुढे नेण्यासाठी पंकजा, डॉ. प्रीतम आणि यशश्री या भगिनींनी स्वत:ला सावरले. गोपीनाथरावांमुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली. अतिशय भावनिक झालेला बीड जिल्हा तर स्वत:च्या लेकीसाठी काहीही करायला तयार होता. लोकसभा निवडणुकीनंतर युती तुटली असताना देखील उद्धव ठाकरे यांनी पंकजा, प्रीतम माझ्या बहिणी आहेत, प्रीतमविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार नाही, अशी जेव्हा घोषणा केली, तेव्हा अख्या महाराष्ट्रातच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बहिणीवरील प्रेम सत्कारणी लागले आणि विक्रमी मतांनी प्रीतम मुंडे विजयी झाल्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतरही परळीत पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध उमेदवार दिला नाही आणि महाराष्ट्राने पुन्हा एकदा उद्धव-पकंजांच्या बहिण-भावांच्या नात्याची वाहवा केली.

कौटुंबिक कलहात एक भाऊ दूर झाला असताना उद्धव यांच्या रुपाने मुंडे भगिनींना एक नवीन भाऊ मिळाला होता. या नात्याचा पुन्हा पुन्हा अविष्कार महाराष्ट्राला पहावयास मिळाला. बहिणीवरील हे प्रेम इतके उफाळून आले होते की, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजाला एक तासासाठी मुख्यमंत्री करा, आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल, असे वक्तव्य करून वंजारा समाजालाही आपलेसे करण्याचा उद्धव यांनी प्रयत्न केला होता. मंगळवारी बीडमध्ये उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना अख्खा बीड जिल्हा भगवामय करण्याची घोषणा करताना पकंजा आणि डॉ. प्रीतम मुंडे भगिनीविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. अवघ्या चार वर्षातच असे काय घडले की बहिणभावांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला, बहिणीवरील प्रेम चार वर्षातच आटले का? असा प्रश्न जिल्ह्यास, महाराष्ट्राला पडला आहे. शिवसेनेच्या काही सरदारांनी जिल्हातील सर्व जागा पक्ष लढविणार असल्याचे काही महिन्यापूर्वी सुतोवाच केले होते, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आणखी एका भावाने बहिणीची साथ सोडताना पहिल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवले असेच म्हणावे लागेल.

Web Title: Within four years, my sister-brother's love ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.