साडेतीन वर्षात पोलिसांकडे आरटीआयचे ७६८ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:14 AM2018-07-16T01:14:56+5:302018-07-16T01:15:18+5:30
बीड : तक्रारी व पोलीस विभागाशी संबंधित माहिती मागविण्यासाठी साडेतीन वर्षात तब्बल ७६८ अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरविण्यात पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक तक्रारींची मागविल्याचे सूत्रांकडून समजते.
माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार सर्वसामान्य नागरिक कोणतीही माहिती मागवू शकतो. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आतापर्यंत ७६८ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज येताच गृह विभागाकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ कलम - ६ (३) (२) अन्वये तो वर्ग केला जातो.
त्याप्रमाणे ठाणे प्रमुख किंवा उप विभागीय पोलीस अधिकारी त्यावर पुढील कार्यवाही करतात. अर्जाची पूर्तता करावी व संबंधिताला कळवावे, असेही पत्रात नमूद असते. शिवाय अर्जदारालाही एक प्रत पाठवून संबंधितांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते.
आॅनलाईन अर्जांची संख्याही वाढली
जानेवारी ते जून २०१८ अखेरपर्यंत २७ आॅनलाईन अर्ज गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच दोन आॅफलाईन अपीलही प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
असे चालते काम
गृह विभागात पोलीस उप अधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु आहे.
संदीप गिराम, जी. बी. सूर्यवंशी हे कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्याकडूनही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
ठाणेप्रमुखच जन माहिती अधिकारी
१ जुलै २०१७ पासून प्रत्येक ठाण्याचे, शाखेचे प्रमुख हे जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच त्या त्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. कामात सुसूत्रता आल्याने नागरिकांना वेळेत परिपूर्ण माहिती मिळत असल्याचे गृह विभागाकडून सांगण्यात आले.