दोन महिन्यांतच स्वच्छता ठेकेदाराने मान टाकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:46+5:302021-02-17T04:39:46+5:30
माजलगाव : येथील नगरपालिकेने नोव्हेंबरमध्ये शहरातील स्वच्छतेचे टेंडर औरंगाबाद येथील कंपनीला दिले होते. दोन महिने सुरळीत चालू ...
माजलगाव : येथील नगरपालिकेने नोव्हेंबरमध्ये शहरातील स्वच्छतेचे टेंडर औरंगाबाद येथील कंपनीला दिले होते. दोन महिने सुरळीत चालू असलेल्या या टेंडरवाल्याने अचानक मान टाकली. विविध भागांत दररोज जाणारी वाहने आता कधीतरी जात असल्याने, शहरात घरोघरी व जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. यामुळे नगरपालिकेचे करोडो रुपये कचऱ्यात जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
माजलगाव नगरपालिकेने ३-४ महिन्यांपूर्वी स्वच्छतेसह विविध कामांचे ऑनलाइन टेंडर काढले होते. स्वच्छतेचे टेंडर २ कोटी २३ लाख ८० हजार ९७६ रुपयांचे होते. ते औरंगाबाद येथील एका व्यक्तीने ३६ लाख रुपये मायनस म्हणजे १ कोटी ८७ लाख ७७ हजार ६३८ रुपयांना घेतले होते. स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेआधीच शहरातील स्वच्छतेची वर्क ऑर्डर २ नोव्हेंबर रोजी देण्यात येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ठेकेदाराच्या यंत्रणेने दररोज दारोदारी जाऊन कचरा गोळा केला. शहरातील जागोजागची स्वच्छता करत नाल्यांची सफाई केली. मात्र, महिना-दीड महिना उलटताच, संबंधित ठेकेदाराने यंत्रणेत कपात करणे सुरू केले. त्यामुळे दररोज दारात येणारी वाहने कधीतरी येऊ लागली. नाल्या जागोजागी तुंबलेल्या दिसत असून कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.
सकाळी व संध्याकाळी कचरा गोळा संकलनासाठी फिरणाऱ्या घंटागाडीत चालकासोबत एका सहकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या व्यक्तीने नागरिकांच्या हातातील डबा घेऊन, तो घंटागाडीत टाकणे आवश्यक असताना, संबंधित कर्मचारी घंटागाडीतच बसून राहतात. घंटागाड्यात तक्रार पुस्तकही ठेवलेले नाही. यामुळे तक्रार करायची झाल्यास कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांपुढे आहे.
३६ लाखांचा मलिदा वाटताच यंत्रणा झाली कमी
या गुत्तेदाराने ३६ लाखांनी मायनस टेंडर भरून घेतले. संबंधित गुत्तेदाराने काम सुरू केल्यानंतर काही पदाधिकारी त्याला त्रास देऊ लागल्याने, त्याला काम करणे अवघड झाले होते. गुत्तेदार व पदाधिकाऱ्यांत काही व्यक्तींनी मध्यस्थी करत, या सर्वांना ३६ लाखांचा मलिदा वाटल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे. यामुळे संबंधित गुतेदाराने यंत्रणा कमी करत, ११९ कामगारांवरून ती संख्या ६०पर्यंत आणल्याने घाण पुन्हा घर करताना दिसत आहे.
संबंधित गुत्तेदाराला अनेक वेळा समजावून सांगण्यात आले आहे. त्याने सुरळीत काम केले नाही, तर त्याला दिलेल्या टेंडरबाबत विचार करण्यात येईल.
- शेख मंजूर, नगराध्यक्ष
फोटो ओळी
माजलगाव नगरपालिकेने शहर स्वच्छ करण्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून टेंडर काढूनही जागोजागी घाण दिसू लागली असून, गटारीही तुंबल्या आहेत, तर घंटा गाडीत कर्मचारी लावलेले असताना, नागरिकांनाच कचरा टाकण्याची वेळ आली आहे.