माजलगाव पोलिसांच्या गस्तीला बारकोडची साक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:19 PM2018-04-02T17:19:34+5:302018-04-02T17:19:34+5:30
मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे.
माजलगाव (बीड ) : मागील कांही दिवसांपासुन चोरांनी मांडलेल्या उच्छादावर मात करण्यासाठी शहरात विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आली आहे. याद्वारे या भागात पोलीसांची गस्त झाली किंवा नाही हे थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांना कळणार आहे.
मागील सहा महिन्यांपासुन माजलगांव शहर व परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या. त्यातील एक दोन चो-यांचे तपास वगळता इतर चोरीच्या घटनांचे तपास लावण्यात पोलीस सपसेल अयशस्वी ठरले. माजलगांव शहरात वाढलेल्या चो-यांचे प्रकार पाहता पोलीस कुठेतरी गस्ती बाबत चुकत आहेत किंवा कामचुकारपणा करीत आहेत अशी शंका उपस्थित होत होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत शहरातील विविध 30 ठिकाणी बारकोड सिस्टीम लावण्यात आल्या आहेत.
रोज रात्री पोलीसांना गस्ती दरम्यान या ठिकाणावर जाऊन या बारकोडचा फोटो अॅपमार्फत घेवून तो अपलोड करावा लागणार आहे. पोलीसांच्या कामचुकारीवर उपाय म्हणुन ही योजना राबविण्यात आलेली असुन आता पोलीसांना रात्रीची गस्त ही कांही केल्या चुकविता येणार नाही. तसेच गस्त करीत असतांना पोलीसांना वेळेचे भान देखील ठेवावे लागणार आहे. शहरातील मंदीरे, चौक, मुख्य गल्ल्यांमधील महत्वाची घरे आदींसह 30 ठिकाणी सदर बारकोड स्टिकर लावण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत हा डिजीटल प्रयोग सुरु असला तरी यामुळे शहरातील चो-याचे प्रमाण आटोक्यात आणण्यात पोलीसांना कितपत यश मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कार्यक्षमता वाढेल
बारकोड सिस्टीमच्या माध्यमातुन शहरातील गस्तीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे गस्तीवर असलेल्या कर्मचा-यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे लगेच उघड होणार असल्याने पोलीसांची कार्यक्षमता वाढेल. असे असतांनाही एखा़द्या ठिकाणी गस्तपथक गेले नाही व तेथे काही अनुचित प्रकार घडल्यास गस्त पथकातील कर्मचा-यांना जबाबदार धरुन दंड लावण्यात येईल.
- विकास दांडे, पोलीस उपनिरीक्षक, शहर पोलीस स्टेशन