सासरच्या छळास कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:24+5:302021-04-16T04:33:24+5:30
पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केज : जमिनीच्या वाटणीसाठी कोर्टात दाखल केलेला दावा काढून घेण्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या ...
पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
केज
: जमिनीच्या वाटणीसाठी कोर्टात दाखल केलेला दावा काढून घेण्याच्या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळास कंटाळून एका ४० वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील उमरी येथे घडली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उमरी येथील मयत सुवर्णमाला अशोक मुळे ( ४० ) या महिलेस दोन मुली, एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. एका मुलीचा विवाह झालेला आहे. तर पती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबातील वाटणीला येणारी जमीन मुलाच्या नावाने करावी यासाठी सुवर्णमाला मुळे यांनी मागील तीन वर्षांपूर्वी सासरच्या लोकांविरुद्ध केजच्या कोर्टात दिवाणी दावा दाखल केलेला होता. तो दावा काढून घ्यावा यासाठी या महिलेचा पती अशोक मनोहर मुळे, सासरा मनोहर पंढरीनाथ मुळे, सासू सुमन मनोहर मुळे, दिर बालासाहेब मनोहर मुळे हे तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या छळास कंटाळून सुवर्णमाला मुळे हिने टोकाची भूमिका घेत ११ एप्रिल रोजी सायंकाळी गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, मस्साजोगचे बिट जमादार दिनकर पुरी, पोलीस नाईक धनपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
उत्तरीय तपासणी इनकॅमेरा
प्रथम केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. नातेवाईकांनी इनकॅमेरा तपासणी करण्याची मागणी केल्याने मृतदेह तेथून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा मृत महिलेचा भाऊ धनराज विठ्ठल थोरात ( रा. कुंभेफळ ता. केज ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अशोक मुळे, सासरा मनोहर मुळे, सासू सुमन मुळे, दिर बालासाहेब मुळे या चौघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.