राग अनावर झाल्याने महिलेचा खून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 11:27 PM2019-11-14T23:27:30+5:302019-11-14T23:28:11+5:30
तालुक्यातील आहेरवडगाव शिवारात ४ आॅक्टोबर रोजी एका बाजरीच्या शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथे असलेल्या काही वस्तू व हाडे ताब्यात घेतली होती. मात्र, ठोस पुरावा आढळून आलेला नव्हता.
बीड : तालुक्यातील आहेरवडगाव शिवारात ४ आॅक्टोबर रोजी एका बाजरीच्या शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथे असलेल्या काही वस्तू व हाडे ताब्यात घेतली होती. मात्र, ठोस पुरावा आढळून आलेला नव्हता. तरी देखील ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा उघडकीस आणला. आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारातून शारदा नामदेव आवाड (५३) या महिलेचा गळा दाबून बाळासाहेब बाबूराव ओंबसे (६३) याने खून केल्याचे निष्पन्न झाले.
आहेरवडगाव शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यावेळी मृतदेहाच्या जवळून चप्पल, साडी, गंगावण, स्कार्फ अशा वस्तू आढळून आल्या होत्या. यावरुन हा मृतदेह महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर हाडे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दिली. डॉक्टरांनी १८ ते २२ वयोगटातील हा मृतदेह असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा , औरंगाबाद येथे हाडे तपासणीसाठी पाठविण्यात आली.
दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी १८ ते २२ वयोगटातील महिला बेपत्ता किंवा संशयरित्या मृत्यू झाल्या आहेत काय ? याचा तपास आहेरवडगाव पंचक्रोशीतील गावांमध्ये केला. मात्र, यात काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर ठाणे प्रमुख सपोनि सुजीत बडे यांना अशा वर्णनाची महिला पुणे येथून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील ठाण्यात वरील वर्णनाची महिला बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल होता. त्यावरुन त्यांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेहाजवळील वस्तू दाखवल्या. यावरुन हा मृतदेह शारदा नामदेव आवाड (रा. माळवाडी, देवगाव, जि. पुणे, मूळ गाव वडवणी, जि. बीड) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. परंतु या महिलेचा खून का झाला ? कोणी केला ? याचा नेमका सुगावा लागत नव्हता.
तपासादरम्यान शारदा यांच्या मुलीला एका नंबरवरुन फोन आला होता. त्यावेळी ‘मैने तुम्हारे अम्मा को मार डाला है, वह हमारे एक लाख रुपये लेके भाग रही थी, इसलिए उसको जान से मार डाला और उसे बीड के पाली घाट में फेंक दिया’ असे हिंदीतून संभाषण केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर मोबाईल क्रमाकांचा तपास केला असता हा क्रमांक आरोपीच्या नावे नव्हता.
दरम्यान, अधिक तपास करीत पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका मंदिरात पुजारी असणाऱ्या बाळासाहेब बाबूराव ओंबसे (रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला बीड येथून अटक केली. त्याची चौकशी केली असता आपणच शारदा यांचा खून केल्याचे कबूल केले. त्याच्याविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शारदा यांची मुलगी संगीता भागवत गायकवाड हिच्या फिर्यादीवरुन गुरुवारी खून, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख सपोनि सुजीत बडे, रमेश दुबाले, अशोक सोनवणे, लक्ष्मण जायभाये, राजाभाऊ गर्जे, व्ही. व्ही. मस्के यांनी केली.
डीएनए चाचणीवरून पटली ओळख
आहेरवडगाव शिवारात आढळलेला मृतदेह हा नेमका शारदा आवाड यांचाच आहे का याची खात्री करण्यासाठी त्यांच्या मुलगा व मुलगी यांच्याशी हाडांची डीएनए चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. याचा अहवाल आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
एका महिन्याने उघडकीस आली होती घटना
खून झाल्यानंतर बाजरीच्या शेतात मृतदेह कुजला होता. वास येत होता परंतु जनावर मेलेले असेल असे समजून कोणीही लक्ष दिले नाही. दरम्यान, एक दिवस उंच वाढलेल्या बाजरीच्या शेतात साडी व हाडे आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी बीड ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला होता.