धारूरमध्ये महिला सरकारी वकिलास लाच घेताना पकडले
By अनिल लगड | Published: September 20, 2022 06:41 PM2022-09-20T18:41:27+5:302022-09-20T18:41:47+5:30
निकालाची प्रत देण्यासाठी घेतले पैसे
बीड : बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने एका महिला सहायक सरकारी वकिलास दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी धारूर न्यायालयाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहायक सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या सुरेखा लांब (वायबसे) यांनी तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम मंगळवारी दुपारी धारूर न्यायालयाच्या आवारात तक्रारदाराकडून स्वीकारत असताना पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.