प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून महिलेचे दागिने चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:36 AM2021-08-26T04:36:11+5:302021-08-26T04:36:11+5:30
केज : प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून तो पेढा प्रसाद म्हणून खायला देऊन गळ्यातील मंगळसूत्र व कानातील ...
केज : प्रसादाच्या पेढ्यात गुंगीचे औषध टाकून तो पेढा प्रसाद म्हणून खायला देऊन गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स असा एकूण ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली.
केज येथील कळंब रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या छाया मुकुंद वाकळे (वय ४८) यांना माणिक त्रिंबक सिरसट व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी इसमाने प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. त्या पेढ्यात गुंगी येणारे औषध मिसळलेले असल्याने प्रसादाच पेढा खाताच छाया वाकळे यांना गुंगी आली. तोच माणिक सिरसट व त्याच्या सोबतच्या अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स असा ३३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढून घेऊन दोघे पसार झाले. गुंगी उतरताच छाया वाकळे यांना गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याचे टॉप्स काढून घेत लुटल्याचे जाणवल्याने त्यांनी याबाबत केज पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. माणिक त्रिंबक सिरसट व त्याचा अनोळखी साथीदाराविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.